पिंपरी चिंचवड : भीमाशंकरमधील कुंडात बुडून भाविकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशहून आलेल्या गुरुदयाल अग्रहारी यांना पहाटे पाण्यात बुडून प्राण गमवावे लागले.


गुरुदयाल अग्रहारी उत्तरप्रदेशहून भाऊ आणि मित्रांसोबत आले होते. महाराष्ट्रातील तीर्थस्थळांचं दर्शन अग्रहारी घेत होते. तिरुपती बालाजीचं दर्शन घेऊन काल रात्री साडेअकरा वाजता ते भीमाशंकरला पोहचले.

आज (रविवारी) सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास गुरुदयाल कुंडाजवळ गेले. तितक्यात त्यांचा तोल गेला आणि ते पाण्यात पडले. वरती यायला मार्ग नसल्यामुळे भाऊ आणि मित्राने त्यांना काठी देऊन वाचवण्याचा प्रयत्न केला.

दाट धुक्यामुळे गुरुदयाल यांना बाहेर काढण्यात अडथळे येत होते. अखेर दम लागल्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाला.