पुणे  : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (Sharad Pawar Group) आमदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या आक्रोश मोर्चात ठाकरे गटाचे संजय राऊतांनी (Sanjay Raut) भाजपवर हल्लाबोल केला. राम मंदिरासाठी मी आतापर्यंत दहा वेळी सीबीआयच्या कोर्टासमोर उभा राहिलोय, तुम्ही काय मला सांगताय, असा थेट वार संजय राऊतांनी भाजपवर केला. यावेळी संजय राऊतांनी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचा निलंबित असा देखील उल्लेख करत मिश्किल टीप्पणी केली. 


राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणार असा विश्वास देखील यावेळी संजय राऊतांनी व्यक्त केलाय. सर्व प्रश्नांना एकच उत्तर श्रीरामाचं दर्शन फ्री, असा खोचक टोला देखील राऊतांनी लगावला आहे. मोदींच्या सगळ्या गॅरंट्यांवर एकच गॅरंटी आहे, ती म्हणजे मोदी वापस नही आयेगा, असा बोचरा वार संजय राऊतांनी केलाय. आपल्याला त्याची मशीन नाही दुकानचं बंद करायचं आहे, असं राऊतांनी म्हटलं. 


राऊतांनी केली अजित पवारांची मिमिक्री


संजय राऊतांनी यावेळी अजित पवारांची देखील मिमिक्री केली. काहीही झालं तरी अमोल कोल्हेंना पाडणारच असा वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं. याच वक्तव्याचा उल्लेख संजय राऊतांनी त्यांच्या भाषणादरम्यान केला. यावर त्यांनी म्हटलं की, आमच्या पाडापाडीच्या खेळात पडाल तर पहिलं तुम्ही पडला.नाव घेऊन थेट बोलायचं असतं आणि तो दम आमच्यात आहे. हवा बोहत तेज चल रही हे, टोपी उड जायेगी अजितराव, असा टोला देखील राऊतांनी अजित पवारांना लगावला. 


शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. त्यामध्ये अगदी काही साध्या मागण्या करण्यात आल्यात. पण या मागण्या घेऊन जर अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे हे अमित शाह किंवा नरेंद्र मोदी यांच्याकडे गेले असते तर त्यांना म्हटलं असतं की, रामलल्ला का दर्शन फ्री मे करावायेंगे. दोन कोटी बेरोजगारांना नोकरी देणार होते, त्यावरपण यांच्याकडे एकच उत्तर की रामलल्ला का दर्शन फ्री करवायेंगे, असं संजय राऊतांनी म्हटलं. 


बाळासाहेब ठाकरे नसते तर मोदी नसते


बाळासाहेब ठाकरे तेव्हा वाजपेयींना म्हणाले होते की, मोदी गए तो गुजरात गया पण आता मोदी आए  तो देश गया अशी स्थिती आहे. इव्हीएम मशीन नसेल तर भाजप ग्रामपंचायत देखील जिंकू शकणार नाही. ही सगळी इव्हीएमची ताकद आहे. कारण त्यांची युती ही फक्त ईव्हीएमसोबत आहे, असा दावा संजय राऊतांनी केलाय. 


हिमालयाने साद घातली की सह्याद्री धावतो


एक काळ होता, आम्ही अभिमाने सांगायचो की हा महाराष्ट्र आधार या भारताचा. आज हा महाराष्ट्र लुटला जातोय. या महाराष्ट्राने देशाचं पोट भरलं अनेक वर्ष. आमचा गुजरातचा विकास होण्यावर आक्षेप नाही, देशाचा विकास व्हायला हवा. तुम्ही आमचे उद्योग न्याल, पण मराठी माणसाचं मनगट आणि धैर्य कसं न्याल.  हिमालयाने साद घातली की हा सह्याद्री हा महाराष्ट्र त्याच्या मदतीला धावून जातो. त्या सह्याद्रीशी अशाप्रकारे खेळण्याचा प्रयत्न करु नका, असा इशारा देखील राऊतांनी केला आहे.  


मोदींनी 'हे' खरेदी देखील केलं 


असं म्हणतात की मोदींनी सगळं विकलं. ओएनजीसी विकलं, हे विकलं पण त्यांनी काही गोष्टी खरेदी देखील केल्या. मोदींनी कोर्ट खरेदी केलं. त्यावर ते आता देश चालवतात, असं म्हणत संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. 


हेही वाचा : 


Amol Mitkari : कोण सर्कशीतला आणि कोण जंगलातला हे दिल्लीपासून गल्लीपर्यंत साऱ्यांना ठाऊक; अमोल मिटकारींचे अमोल कोल्हेंना प्रत्युत्तर