Sambhaji Raje On Abu Azami: आधी अबू आझमींना महाराष्ट्रातून बाहेर काढा. महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमान सहन करणार नाही.अबू आझमी महाराष्ट्रात का राहतात, अशा माणसाला आधी महाराष्ट्रातून हाकलून देण्याची हिंमत कशी झाली? शिवाजी महाराजांनी मुघलशाहीला महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशातून हाकलून देण्याचा निर्णय घेतला होता आणि अशी माणसे महाराष्ट्रात राहतात हे दुर्दैव आहे. महाराष्ट्रातील नागरिकांनी त्यांना सांगावे की तुम्हाला महाराष्ट्रात राहायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकर आणि सर्व संतांची नावे घ्या, अशी टीका खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमींवर केली आहे. ते लोणावळ्यात बोलत होते.
औरंगाबाद शहराचे ‘संभाजीनगर’ असे नामकरण करण्यावरून गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने या प्रस्तावाला स्थगिती दिली होती आणि काहीच दिवसांत त्यांनी पुन्हा हा प्रस्ताव मंजूर केला. नुकतेच समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचे एक वादग्रस्त विधान समोर आले आहे. औरंगजेब काही वाईट राजा नव्हता. औरंगजेबाचा खरा इतिहास लोकांसमोर आणल्यास कोणत्याही हिंदू व्यक्तीला राग येणार नाही. असे आझमी यांनी म्हटले आहे. यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यावरुन अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी त्यांच्यावर हल्लाबोल देखील केला आहे.
काय म्हणाले अबू आझमी?
औरंगाबादमधील अनेकांची नावे औरंगजेब असून रावसाहेब दानवे यांचा दावा खोटा असल्याचे अबू आझमी यांनी म्हटले आहे. औरंगजेब वाईट राजा नव्हता. औरंगजेबाचा खरा इतिहास लोकांसमोर आणल्यास कोणत्याही हिंदू व्यक्तीला राग येणार नाही. सध्या त्यांचा इतिहास चुकीचा दाखवला जात आहे. औरंगजेब चांगला मुस्लिम होता. औरंगजेबाने कधीही हिंदू-मुस्लिम युद्ध केले नाही.औरंगाबाद, अहमदनगर आणि उस्मानाबाद ही महाराष्ट्रातील तीन शहरांची मुस्लिम नावे आहेत. ही तीन नावे बदलून महाराष्ट्रातील लोकांना रोजगार मिळेल, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील, विकास होईल, तर मी नामकरणाचे स्वागत करेन, असं आझमी म्हणाले होते.