पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या सध्या पुण्यातील फुलेनगर भागात आहेत. त्या पालखी सोहळ्यात शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडेसुद्धा सहभागी होणार आहेत. संभाजी भिडे पुण्यात दाखल झाले आहेत. संचेती पुलापासून ते वारीत सहभागी होण्याची शक्यता आहे. मात्र पोलिसांनी संभाजी भिडेंना पालखी सोहळ्यात सहभागी होऊ नये, यासाठी नोटीस बजावली आहे.
संभाजी भिडे यांचे शेकडो अनुयायीही त्याच्याबरोबर पुण्यात उपस्थित आहेत. जंगली महाराज मंदिरात भिडे गुरुजींनी धारकऱ्यांना संबोधित केलं. मंदिराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातून 500 पेक्षा अधिक धारकरी आले आहेत. गेल्या वर्षीसुद्धा पालखी सोहळ्यातील संभाजी भिडेंच्या सहभागावरून वाद झाला होता. ज्ञानोबा माऊलींच्या पालखीत वाद झाल्याने शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे, संजय जठार, पराशर मोने, रावसाहेब देसाई यांच्यासह जवळपास अनेकांवर गुन्हे नोंदवण्यात आले होते.
फर्ग्युसन रस्त्यावरुन माऊलींची पालखी जात असताना धारकरी पालखीच्या सुरुवातीला येऊन चालू लागले. त्यावेळी त्यांच्या हातात तलवारीसुद्धा होत्या. या प्रकारावर दिंडीतल्या काही प्रमुखांनी आक्षेप घेतल्यानंतर पोलिसांनी गुन्हे नोंदवले होते.
धारकरी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमागे चालणार आहेत. गेल्या वर्षी धारकरी तलवारी घेऊन पालखीमार्गात सहभागी झाल्याने मोठा वाद झाला होता. त्यामुळे यंदाही याठिकाणी वाद होण्याची चिन्हं होती. खबरदारी म्हणून आळंदी सोहळा प्रमुखांनी आधीच पोलिसांना याबाबतचं पत्र दिल्यानंतर पोलिसांनी शिवप्रतिष्ठानला नोटीस बजावली. यावर धारकरी कोणताही अडथळा आणणार नाहीत आणि पालखी आणि दिंड्या पुढे निघून गेल्यानंतर पाठीमागून चालत येतील, असं आश्वासन शिवप्रतिष्ठानकडून देण्यात आलं.
पोलिसांनी नोटीस देऊनही संभाजी भिडे पालखीत सहभागी होण्यासाठी पुण्यात
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे
Updated at:
07 Jul 2018 05:21 PM (IST)
संभाजी भिडे पुण्यात दाखल झाले आहेत. संचेती पुलापासून ते वारीत सहभागी होण्याची शक्यता आहे. मात्र पोलिसांनी संभाजी भिडेंना पालखी सोहळ्यात सहभागी होऊ नये, यासाठी नोटीस बजावली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -