पुणे : पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि पोलिसांसमोरुन पळून जाणारा मेपल ग्रुपचा संचालक सचिन अग्रवाल आता सापडत नसल्याचा दावा पुणे पोलिसांनी केला आहे. सचिन अग्रवालसह त्याचा भाऊ नवीन अग्रवाल आणि कंपनीच्या मार्केटिंग हेड प्रियांका अग्रवालही गायब असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.   19 तारखेला सचिन अग्रवालवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. त्यावेळी सचिन पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शिवाजीनगर भागातच होता.   शिवाजीनगर पोलिसांची टीम त्या वृत्तवाहिनीच्या कार्यालायात पोहोचली. मात्र, त्या ठिकाणी अग्रवाल आम्हाला दिसलाच नसल्याचा दावा या पोलिस पथकानं केला.   शिवाजीनगर पोलिसांच्या मते त्यांनी गुन्हा नोंद केल्यानंतर तो आर्थिक गुन्हे शाखेकडे लगेच वर्ग केला. त्यामुळे अग्रवालला पकडण्याची जबाबदारी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची होती. तर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या मते त्यांच्याकडे रात्री उशीरा तपास सोपवण्यात आला. त्यामुळे त्यांच्याकडे तपास सोपवण्याच्या आधी जर अग्रवालचा ठावठिकाणा माहीत झाला होता, तर त्याला पकडण्याची जबाबदारी शिवाजीनगर पोलिसांची होती.   पोलिसांच्या या वादामध्ये हजारो नागरिकांना लुटणारा सचिन अग्रवाल मात्र पसार होण्यामध्ये यशस्वी ठरला आहे.