Russian Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धाला सहा महीने पुर्ण झाले. युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी आहेत. या युद्धामुळे भारतातील अनेकांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे. युद्ध आणि युद्धजन्य परिस्थीती आपल्यातील अनेक लोक बघतात किंवा ऐकतात मात्र भारतातील अनेक विद्यार्थी या युद्धजन्य परिस्थितीत अडकले होते. त्यांनी युद्धजन्य परिस्थिती अनुभवली आणि त्यातून सुखरुप बाहेरही आले मात्र त्यांच्या या युद्धाचा त्यांच्या मनावर झालेला परिणाम आणि त्यांनी अनुभवलेल्या युद्धाचा थरार कधीही न विसरण्यासारख्या आहे. याच युद्धात चर्नीवील शहरात अडकलेल्या निधी जगतापने तिचा अनुभव एबीपी माझाबरोबर शेअर केला आहे. तो आवाज आणि आम्ही पाहिलेले रणगाडे आठवले की आजही मला झोप लागत नाही, असं निधी जगताप सांगते.
मी तृतीय वर्षात वैद्यकीय शिक्षण घेत होते.त्या काही दिवसांपासून युक्रेनमध्ये तणावपूर्ण वातावरण होते. युद्धाला सुरुवात होताच भारताचे-आपल्या पुण्याचे, घरचे वेध लागले. त्यामुळे धोका पत्करून आमचा प्रवास सुरू झाल. आमचे विमान कतारवरून होते. मात्र युद्धामुळे विमान रद्द झाले, त्यामुळे आम्हाला रोमानिया बॉर्डरवर यावे लागले. काही काळ भारतीय दुतावासांशी संपर्क होत नव्हता यासाठी 30 कि.मी. पायपीट केली. तेव्हा युक्रेनमध्ये बर्फवृष्टी होत होती. युद्ध काय असते ते आम्ही प्रत्यक्ष पाहिले. जीवाचा थरकाप उडत होता, असं म्हणत तिने युक्रेन युद्धाचा थरार सांगितला.
माझ्या होस्टेलच्या बाहेर फार युद्धजन्य वातावरण होतं. खिडकीतून बाहेर बघितलं की रणगाडे दिसायचे. आम्ही जीव मुठीत घेऊन तिथे दिवस काढले. त्यानंतर आम्ही भारतात येण्यासाठी प्रचंड प्रयत्नात होतो. भारतीय राजदूतांना आणि कॉलेजशी संपर्क साधून आम्हाला भारतासाठी तिकीट मिळालं . आमची 30 जणांची तुकडी होती. आम्ही सगळे बसने रोमानिया शहराकडे निघालो. वाटेत कधी जीव जाईल याचा नेम नव्हता भररस्त्यात फायरींग सुरु होतं. बसवर भारताचा तिरंगा होता. तोच तिरंगा आमचं संरक्षण करत होता. आमची उमेद टिकवून ठेवण्याचं काम करत होता. त्याच बसमधून आम्ही सुखरुप रोमानियाच्या विमानतळावर पोहचलो, असं निधी सांगते.
अखेर मायदेशी परतलो
जीव मुठीत घेऊन दिल्ली विमानतळावर पोचल्यावर बरे वाटले. पुण्यात आल्यावर आणि आई-वडिलांना पाहून अश्रू वाहू लागले. युक्रेनमध्ये त्यावेळी माझे अनेक मित्र मंडळी अडकली होती. त्याचे आई वडीलांचे डोळे त्यांच्या येण्यावर लागले होते. मी सुद्धा त्यावेळी सतत त्यांच्या संपर्कात होते. यापुढील शिक्षणाचं काय होईल माहित नाही मात्र युद्ध यापुढे कुठेच होऊ नये, असं ती पाणावलेल्या डोळ्यांनी सांगत होती.