Russia Ukraine War : रशिया-युक्रेनच्या युध्दाची पिंपरी चिंचवडमधील लघुउद्योजकांनाही झळ बसली आहे.  एक-दोन नव्हे तर तब्बल दोनशे कोटींचा फटका लघु उद्योगांना बसला आहे. रशिया-युक्रेन  युद्धामुळं लघुउद्योगांना लागणाऱ्या कच्च्या मालात 25 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोनातून सावरत असलेल्या लघु उद्योजकांसमोर हे नवं संकट उभं राहिलंय. 

 रशिया-युक्रेन युद्धाची झळ आता पिंपरी चिंचवडच्या लघु उद्योजकांना बसली आहे. भोसरी एमआयडीसीमधील अवि इंडस्ट्रीजचे मालक विशेष बन्सल त्यामुळेच चिंतेत आहेत. मर्सडीज, फोक्सव्हॅगन, टाटा, महिंद्रा सारख्या कंपन्यांना सायलेन्सरचे पार्ट पुरविण्यात त्यांचा हातखंडा आहे. पण रशिया-युक्रेनच्या युद्धामुळं कच्चा माल 25 ते 30 टक्क्यांनी महाग झाला आहे. अन् दुसरीकडे ग्राहक मात्र सरासरी अवघ्या पाच टक्क्यांची वाढ देणार आहेत. त्यामुळे त्यांना महिन्याभरात चाळीस लाखांचे नुकसान होत आहे.  रागा कॉर्पोरेशनचे मालक प्रमोद राणेंची देखील ह तीच अवस्था आहे. डेअरी आणि फूड कंपन्यांना गेल्या पंचवीस वर्षांपासून ते साहित्य पुरवतात. यासाठी लागणाऱ्या कच्चा मालाचे दर वाढल्याने, त्यांना  दहा लाख अधिक मोजावे लागलेत.

 रशिया-युक्रेनच्या युद्धामुळं अशी दरवाढ झाली आहे. (दर प्रति किलो नुसार)

  24 फेब्रुवारी पूर्वीचे दर    25 मार्च
लोखंड 65 रु    80 रु
स्टेनलेस स्टील 230 रु   300 रु
कॉपर     750  रु   900 रु
अल्युमिनियम      220  रु    310 रु

तसेच इतर कच्च्या मालात ही 25 ते 30 टक्क्यांची वाढ झाली आहे. रशिया आणि युक्रेनमधून आयात ठप्प झाल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे नाही म्हटलं तरी नफ्यातील 200 कोटी नुकसान ठरलेलं आहे.

 पिंपरी चिंचवडमधील अकरा हजार लघुउद्योग कोरोनाच्या पहिल्या लाटेत सलग दोन महिने बंद होते. तेव्हा जवळपास आठशे कोटींची आर्थिक उलाढाल ठप्प झाली होती. त्यातून या कंपन्या आत्ता कुठं सावरत होत्या, तेवढ्यात रशिया आणि युक्रेनच्या युद्धाने पुन्हा एकदा विघ्न आणले आहे. या युद्धामुळं 25 ते 30 टक्के कच्चा माल महागलाय, त्यामुळं या सर्व कंपन्यांच्या दोनशे कोटींच्या नफ्यावर पाणी फेरलं गेलंय. आता हीच तूट कशी भरून काढायची असा प्रश्न या लघु उद्योजकांसमोर उभा ठाकला आहे.