Bhandara News : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मातोश्रींचं दुःखद निधन झालं आहे. त्यांच्या सांत्वनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज भंडाऱ्याच्या सुकळी या गावात आले होते. अगदी 10 मिनिटांचा हा मुख्यमंत्र्यांचा दौरा होता. मात्र, हा 10 मिनीटांचा मुख्यमंत्र्यांचा दौरा भंडाऱ्याच्या एका छोट्याशा गावातील आणि गरीब शेतकरी कुटुंबातील मुलीच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला आहे. 


पल्लवी सेवकराम डोंगरवार ही भंडाऱ्याच्या साकोली तालुक्यातील सेंदूरवाफा येथील राजीव गांधी महाविद्यालयात शिकणारी 19 वर्षीय धावपटू आहे. 5 ते 8 जानेवारी दरम्यान झारखंडच्या रांची इथं पार पडलेल्या 68 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत पल्लवीनं महाराष्ट्राचं नेतृत्व करत ही स्पर्धा गाजवली होती. तसेच 4 X 400 रीले धावण्याच्या शर्यतीत देखील पल्लवीनं महाराष्ट्रासाठी ब्राँझ पदक मिळवून दिलं होतं. नाना पटोले यांच्या गावाशेजारील वांगी येथील पल्लवीची माहिती स्वतः नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली होती. यावेळी क्षणाचाही विलंब न लावता देवेंद्र फडणवीस यांनी लगेच पल्लवीला बोलावून घेतं तिची आस्थेनं विचारपूस केली. तिच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. यावेळी तिनं महाराष्ट्रासाठी पदक जिंकलं असल्यानं तिला चांगलं प्रशिक्षण मिळाल्यास ती पुढं महाराष्ट्रासाठी चांगली कामगिरी करेल हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेरलं. तसेच फडणवीस यांनी लगेच कुठल्याही क्षणाचा विलंब नं लावता पल्लवीचं पालकत्व महाराष्ट्र शासन स्वीकारेल. तिला चांगलं प्रशिक्षण मिळावं, यासाठी पुणे येथील बालेवाडी येथील प्रशिक्षण संस्थेत पाठविण्याचं आणि पूर्ण प्रशिक्षणाची जबाबदारी महाराष्ट्र शासन उचलेल असं आश्वासन दिलं. मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन आणि दिलेली कौतुकाची थाप यामुळं ग्रामीण भागातील धावपटू असलेल्या पल्लवीच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे. 


ग्रामीण भागात पल्लवीसारखे हुशार आणि गुणी अनेक कलाकार आहेत. या मुलांना आर्थिक पाठबळ आणि योग्य प्रशिक्षण मिळणं गरजेचं आहे. हे मिळाल्यास ही मुलं देशाचं आणपल्या महाराष्ट्राचं नाव नक्कीच जगाच्या नकाशावर कोरतील अशा भावना खेड्यातील लोक बालून दाखवत आहेत. अनेकदा ग्रामीण भागातील लोक आर्थिक स्थिती कमकुवत असल्यामुळं मुलांना योग्य त्या प्रकारचं प्रशिक्षण देऊ शकत नाहीत. त्यामुळं अनेकदा मुलं खचून जातात. त्यांमुळं अशा मुला मुलींना सरकारनं पाठबळ दिल्यास नक्कीच ही मुलं देशाचं नाव रोशन करतील.


महत्वाच्या बातम्या:


शरद पवारांनी घेतली संतोष देशमुखांच्या लेकीच्या शिक्षणाची जबाबदारी; मस्साजोग ग्रामस्थांचा आक्रोश