पुणे : दौंडमधील माहिती अधिकार कार्यकर्ते निसार शेख यांनी तीन दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी एका चिठ्ठीत 11 जणांची नावं लिहून, त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

दौंड शहरात एकाच नावाचे दोन मदरसे चालू असून, त्याबद्दल आरटीआय कार्यकर्ते निसार शेख यांनी पुण्यातील धर्मादाय आयुक्तांकडे माहिती मागितली होती. याचा पाठपुरावाही ते वारंवार करत होते. मात्र मदरशांशी संबंधित 11 जण निसार शेख यांना त्रास देऊ लागले आणि त्या त्रासाला कंटाळून निसार शेख यांनी आत्महत्या केली.

माझ्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या 11 जणांवर जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत माझ्या पार्थिवाचे दफन करु नये, असे निसार शेख यांनी चिठ्ठीत लिहिले आहे. शिवाय, त्यांनी आत्महत्येपूर्वी या संदेशाचा व्हिडीओही तयार केला.

आता आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय निसार शेख यांच्या कुटुंबीयांनी घेतला आहे.

मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत ज्यांची नावं आहे, त्या 11 जणांवर गुन्हे दाखल केले असून, त्यांचा तपास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, या घटनेला तीन दिवस उलटून गेल्यानंतरही पोलिस आरोपींना अटक करु शकले नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे.