पुणे : गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात अनेक नेत्याचे गुंडांसोबत फोटो व्हायरल झाले होते. शिवाय अनेक नेत्यांनी कुख्यात गुंडांकडून सत्कारही स्वीकारल्याचे फोटो आणि चर्चा समोर आल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी कुख्यात गुंड गजा मारणे (Gaja Marane) यांच्याकडून सत्कार स्वीकारला होता. त्यानंतर लंकेंवर टीका झाल्यानंतर गजा मारणेची पार्श्वभूमी माहिती नसल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं होतं. दरम्यान आता भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीही गजा मारणेकडून सत्कार स्वीकारला आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटलांवरही विरोधकांकडून टीका केली जात आहे. त्यांचा हा फोटो समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत चंद्रकांत पाटलांना (Chandrakant Patil) लक्ष्य केलं आहे.
मंत्र्यांनी गुन्हेगारांना सोबत घेऊन फिरणं म्हणजे या सरकारने लाडका गुन्हेगार योजना सुरू केल्याचं लक्षण आहे, परंतु विधानसभा निवडणुकीत गुन्हेगारांच्या मदतीने जिंकण्याची स्वप्न पाहणाऱ्यांनी हा महाराष्ट्र आहे हे मात्र विसरू नये, अशा शब्दात रोहित पवारांनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली आहे. त्यांनी आपल्या सोशल मिडिया पोस्टमध्ये चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) सत्कार स्वीकारतानाचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे.
आपल्या पोस्टमध्ये काय म्हणालेत रोहित पवार?
मंत्र्यांनी गुन्हेगारांना सोबत घेऊन फिरणं म्हणजे या सरकारने #लाडका_गुन्हेगार_योजना सुरू केल्याचं लक्षण आहे, परंतु विधानसभा निवडणुकीत गुन्हेगारांच्या मदतीने जिंकण्याची स्वप्न पाहणाऱ्यांनी हा #महाराष्ट्र आहे हे मात्र विसरू नये. असो!
@Dev_Fadnavis साहेब तुमचे खासदार पोलिसांना धमक्या देतात, पत्रकारांना धक्काबुक्की करतात, मंत्री गुंडांना भेटतात यालाच #पार्टी_विथ_डीफरन्स म्हणायचं का? आपल्या याच आदरातिथ्यामुळं गुंडाचा आत्मविश्वास द्विगुणीत झाला असून गुन्हेगारी वाऱ्याच्या वेगाने फोफावत चाललीय. गुंडांना राजाश्रय देण्याच्या आपल्या कृत्यामुळं दहशतीखाली असलेली सामान्य जनताच आपल्याला योग्य वेळी चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही.
कोण आहे गजा मारणे? (Who Is Gaja Marne)
अमोल बधे आणि पप्पू गावडे खून प्रकरणात कुख्यात गुंड गजा मारणेला अटक करण्यात आली होती. तो 3 वर्ष येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता.तो आता मारणे टोळीचा म्होरक्या असल्याचे बोलले जाते. या टोळीवर 23 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. गजा मारणेवर सहापेक्षा अधिक खुनाचे गुन्हे दाखल आहेत. मागील वर्षी पुण्यातील व्यावसायिकाला 20 कोटी रुपयांची खंडणी मागणी केल्याप्रकरणात कोर्टाने जामीन मंजूर केला होता.