पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेची अनेक कारणं आहेत. त्यातलं एक कारण म्हणजे त्यांच्याकडून साध्यातल्या साध्या व्यक्तीच्या कामाची घेतली जाणारी दखल. पिंपरी चिंचवड मधल्या चंद्रकांत कुलकर्णींच्या कामाचंही अशाचप्रकारे पंतप्रधानांनी कौतुक केलं.


 
पिंपरी चिंचवडच्या आकुर्डीतील चंद्रकांत कुलकर्णी यांनी स्वच्छ भारत अभियानाला केलेल्या भरीव आर्थिक मदतीमुळे मोदींनी त्यांचं कौतुक केलं. निवृत्तीनंतर सामाजिक कार्यात रमलेल्या 67 वर्षीय चंद्रकांत कुलकर्णींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 15 ऑगस्ट रोजी झालेलं भाषण ऐकलं. त्यात पंतप्रधानांनी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्याची गरज बोलून दाखवली. कुलकर्णी यांना ती खूपच भावली आणि 15 हजार निवृत्ती वेतनातील प्रत्येक महिन्याचे पाच हजार या प्रमाणे 52 महिन्यांचे तब्बल दोन लाख 60 हजार रुपयांचे आगाऊ धनादेश त्यांनी या अभियानासाठी दिले.

 
पेन्शनमधील जवळपास एक तृतीयांश रक्कम देणाऱ्या या निवृत्त शिक्षकाची दखल मोदींनी घेतली. पुण्यात झालेल्या स्मार्ट सिटीच्या कार्यक्रमात त्यांना आवर्जून आमंत्रित केलं. त्याची 'मन की बात'मध्ये दखलही घेतली आणि फेसबुकवर कुटुंबीयांच्या भेटीचा फोटोही उपलोड केला. मोदींची ही भेट सुखद धक्का असल्याचं कुलकर्णी सांगतात.

 
चंद्रकांत कुलकर्णी यांच्याबरोबरच त्यांचं संपूर्ण कुटुंब मोदींच्या भेटीला गेलं होतं, त्यामुळे कुटुंब भारावून गेलंय. घरातल्या छोट्या आदीसाठी तर ही भेट अविस्मरणीय ठरलीय...! कुटुंबियांशी संवाद साधत असताना मोदींनी आदीशी ही संवाद साधला. आजोबांना मदत करतो का असा प्रश्न त्यांनी विचारला, तेव्हा आदीने प्रामाणिकपणे नाही सांगितलं.

 
विकासाचा ध्यास घेत नरेंद्र मोदी सध्या काम करत आहेत. विकासाच्या या कामात मदत करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची दखल ते ट्विटर, फेसबुक किंवा मन की बात मध्ये घेतात. कुलकर्णी यांना तर थेट त्यांना भेटण्याची संधी मिळाली आणि त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.