पुणे: पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) अनेक भागात पाणी छातीपर्यंत साचलं आहे. पुण्याच्या अनेक भागात लोक अडकले आहेत. प्रशासनाकडून काही भागात बचावकार्यसुरू केलं आहे. पुण्यातील सिंहगड परिसरातील निंबजनगर येथे मोठ्या प्रमाणावर लोक अडकले होते. याठिकाणी प्रशासन पोहोचलेलं नव्हतं. एबीपी माझाने याबाबचे वृत्त दाखवल्यानंतर आता बचावकार्य सुरू झाले आहे. अनेक जण आपल्या घरामध्ये अडकून पडले आहेत. अद्याप मुसळधार पाऊस कोसळत आहे. 


निंबजनगर परिसरात प्रशासनाच्यावतीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. बोटीच्या सहाय्याने लहान मुले, महिला यांना बाहेर काढण्यात येत आहे. या ठिकाणी अनेक नागरिकांच्या वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पुण्यातील अनेक भागांत अक्षरश: छातीपर्यंत पाणी साचलं आहे. सिंहगड रस्त्यावरील सोसायट्या पाण्याखाली गेल्या आहेत. मुसळधार पावसामुळे सिंहगड रस्त्यावरील (Sinhagad Road) 5 सोसायट्यांमध्ये पाणी घुसलं आहे. एकता नगर परिसरातील द्वारका, जलपूजन, शारदा सरोवर, शाम सुंदर या सोसायट्या पाण्याखाली गेल्या आहेत. तर एबीपी माझाने दाखवलेल्या वृत्तानंतर निंबजनगर भागात छातीपर्यंत पाणी साचल्याने नागरिकांची रेस्क्यू बोटींद्वारे सुटका केली जात आहे.


मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) अनेक भागातील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. पुण्यातील एकता नगर परिसरात छातीपर्यंत पाणी साचलं आहे. पुण्यात एकता नगर परिसरात बोटीद्वारे बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. परिसरात पाण्याची पातळी वाढत चालली आहे. पाण्याचा प्रवाह वाढल्याने बोटीद्वारे बचावकार्य करण्याच्या प्रयत्नात अडथळे निर्माण झाले आहेत. शेकडो लोक एकता नगर भागात अडकले आहेत. पाणी मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहे. अडकलेल्या नागरिकांच्या बचावासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. 






 


 


पुणे शहर व जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला परिस्थितीचा आढावा


 पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज सकाळीच जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाचे प्रमुख सुहास दिवसे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून जिल्ह्यातील पूरपरिस्थिती तसेच बचाव व मदतकार्याच्या तयारीचा आढावा घेतला.


पुण्यातील परिस्थिती आणखी भीषण होण्याची शक्यता



पुणे महापालिकेने (Pune Rain) जलसंपदा विभागाला पाण्याचा विसर्ग कमी करण्याची विनंती केली. मात्र मुसळधार पावसामुळे पाण्याचा विसर्ग आणखी वाढवावा लागेल असं उत्तर जलसंपदा विभागाने महापालिकेला दिलं आहे. 


अद्याप मुसळधार पाऊस सुरूच



रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नागरिकांचे जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे. तर आज पुणे शहराला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.


पुण्यात धक्कादायक घटना! विजेचा शॉक लागून 3 तरुणांचा मृत्यू


पुण्यात तीन तरुणांचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. डेक्कन नदीपात्रातील पुलाची वाडी येथील ही घटना आहे. अंडा भुर्जीची गाडी दुसऱ्या जागी हलवत असताना शॉक लागून तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.हे तिघे जण अंडा भुर्जीच्या गाडीवर काम करत होते. रात्री गाडी बंद करून पाऊस जोरात आला म्हणून तिथे आवराआवरी करायला परत गेले होते. तिथे गुडघाभर पाणी साचलं होते. महावितरणाने घटनेची पुष्टी केली आहे. त्यांचे अधिकारी घटनास्थळी पोचले आहेत. पोलीस, महापालिका अधिकारीही घटनास्थळी आहेत.