Pune water Crises: सोमवारपासुन पुण्यात लागू करण्यात आलेली पाणीकपात शुक्रवारपासून मागे घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. आषाढी एकादशी आणि ईदचा सण असल्याने ही पाणीकपात मागे घेत असल्याच महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांमधील पाण्याची पातळी खाली गेल्याने सोमवारपासुन सात दिवसांसाठी पाणीकपात लागू करण्यात आली होती. मात्र गेले दोन दिवस पुण्यात आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडत असुन पाणी साठ्यात देखील वाढ झालीय.  


सध्या पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांमधे मिळून 14 टक्के पाणीसाठा आहे.  11 तारखेनंतर पाणीकपात पुन्हा लागू करायची की नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा करायचा हे परिस्थिती पाहून ठरवण्यात येणार आहे.


पुण्यात पाण्याचे वेळापत्रक काढण्यात आले होते. त्यानुसार शहराला पाणीपुरवठा होणार होता. मात्र हे वेळापत्रक कोलमडल्याचं चित्र गेले दोन दिवस बघायला मिळालं. परिणामी अनेकांना पाण्याचं ट्रँकर बोलवण्याची वेळ आली होती. मोठ्या सोसायट्यांना याचा चांगलाच फटका बसल्याचं बघायला मिळालं. वेळापत्रकात परिसराप्रमाणे पाणी पुरवठ्याचं नियोजन करण्यात आलं होतं. मात्र या वेळापत्रकाची माहिती नागरिकांना नीट पोचली नसल्याने अनेकांची तारांबळ उडाली होती. परिसरातील नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधी प्रत्येकवेळी माहिती देणारे व्हाट्सअप पोस्टर तयार करुन गृपवर व्हायरल करतात मात्र यावेळी तसं देखील झालं नसल्याने नागरिकांना पाण्याची समस्या निर्माण झाली होती.


 पुण्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्येही पाणीकपातीची शक्यता?
पिंपरी चिंचवडमध्येही काही दिवसात पाणीकपात होण्याची शक्यता आहे. ऐन पावसाळ्यात त्यांच्यावर पाणी कपातीच संकट ओढवणार आहे. पाठ बंधारे विभागाने पाणी कपात करण्याच्या सूचना महपालिकेला दिलेल्या आहेत. पावसाने ओढ दिल्याने शहराची तहान भागविणाऱ्या पवना धरणात धरणात केवळ साडे सोळा टक्केच पाणी साठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेला 35 टक्के पाणी साठा निर्माण झाला होता. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत तर शहरातील नागरिकांवर पाणी कपातीची कुऱ्हाड कधी ही पडू शकते.