पुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या संदर्भात मंत्री आणि शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी अनेकदा भाष्य करताना काही माजी आमदार व खासदार आमच्या संपर्कात असून लवकरच त्यांचा शिवसेनेत प्रवेश होईल असं म्हणत मोठ्या राजकीय भुकंपाची शक्यता वर्तवली होती. काँग्रेसचे माजी आमदार व पुण्यातील रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हेही धनुष्यबाण हाती घेणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या, त्याच कारण म्हणजे धंगेकरांनी शिंदेंची घेतलेली भेट. त्यावरती आज रवींद्र धंगेकरांनी भाष्य करत त्यांच्या पुढच्या निर्णयाबाबत स्पष्टपणे सांगितलं आहे. या प्रकरणी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देणं टाळल्याचं दिसून आलं.


आज पत्रकार परिषदेत पत्रकारांनी काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा आहेत, प्रश्नावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलताना पहिल्यांदा हसले आणि म्हणाले, 'कसं आहे, काही लोक राजकारणात व्यवसायिक असतात. सत्ता ज्याची आहे, त्याप्रमाणे काही वागणारे लोक असतात. त्यामुळे मी आज त्यावर काय प्रतिक्रिया देणार नाही. पण, मला असं वाटतं की, महाराष्ट्रामध्ये जनमत हे काँग्रेसच्या बाजुने आहे', असं म्हणत नाना पटोले यांनी रवींद्र धंगेकरांच्या शिवसेना पक्षप्रवेशाच्या आणि भेटीच्या चर्चांवर प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. 


पक्षप्रवेशावर काय म्हणाले धंगेकर?


एबीपी माझाला याबाबत प्रतिक्रिया देताना धंगेकर म्हणाले, "मी माझ्या वैयक्तिक कामासाठी गेलो होतो. मी कायम विरोध करतो. मात्र, माझी काही काम अडतात. त्यामुळे मी त्यांच्याकडे जाऊन काही कामांचा पाठपुरावा करायला मी त्यांच्याकडे गेलो होतो. मी लढणारा आहे. सध्या कोणत्याही पक्षात जाण्याचा माझा विचार नाही. कायम विरोधात लढत आलोय. अजून पण लढत राहील. काल मी माझ्या कामासाठी एकनाथ शिंदे यांना भेटलो. माझं व्यक्तीगत काम होतं. कामानिमित्त मला त्यांना भेटायच होतं. पक्षात जाण्याविषयी काही चर्चा काही झाली नाही", असंही पुढे धंगेकर म्हणाले आहेत.


काल (गुरूवारी ता.30) राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना (Shivsena) पक्ष प्रमुख एकनाथ शिंदें यांची काँग्रेस नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी भेट घेतली. त्यानंतर ते काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार आणि शिवसेनेत प्रवेश करणार याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या. मात्र, आता खुद्द धंगेकरांनी या सर्व चर्चा आणि शक्यता फेटाळून लावत आपण काँग्रेस (Congress) सोडून कुठेही जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. माध्यमांना प्रतिक्रिया देताना रवींद्र धंगेकर यांनी आपण एकनाथ शिंदेंना का भेटलो याबाबतची माहिती सांगितली आहे.