पुणे: पुणे जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome)चे रूग्ण आढळून येत आहेत.  पिंपरी चिंचवडमध्ये जीबीएसने पहिला रुग्ण दगावला असल्याची माहिती समोर आली आहे. 36 वर्षीय हा तरुण पिंपळे गुरवचा रहिवासी होता. 21 जानेवारीला तो महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल झाला. मात्र ,उपचारासाठी आला तेव्हापासून तो व्हेंटिलेटरवर होता. गेली आठ दिवस त्याला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न केले, मात्र, काल (बुधवारी, ता.30) त्याने अखेरचा श्वास घेतला. पुणे शहर परिसरात आत्तापर्यंत जीबीएसचे 130 रुग्ण आढळलेत. तर महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयाच्या ऑडिट रिपोर्टमध्ये जीबीएसमुळं हा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. वैद्यकीय विभागाचे प्रमुख डॉक्टर लक्ष्मण गोफणेंनी ही माहिती दिली आहे. पिंपळे गुरव भागातील हा तरुण ओला-उबेरचा चालक असून तो 21 जानेवारीला वायसीएम रुग्णालयात दाखल झाला.


उपचारांसाठी दाखल झाला तेव्हापासून त्याची तब्येत खालावलेली होती, त्यामुळं पहिल्याच दिवशी त्याला व्हेंटिलेटरवर घ्यावं लागलं होतं. तो ओला-उबेर चालक असल्यानं त्याने कोणत्या परिसरातील पाणी प्यायल्याने त्याला जीबीएसची लागण झाली, याचा शोध लागेना. याबाबत वैद्यकीय विभागाचे अधिकारी प्रमुख डॉक्टर लक्ष्मण गोफणे यांनी एबीपी माझाला सविस्तर माहिती दिली आहे. मृत हा पिंपळे गुरव भागातील रहिवासी आहे. तो ओला-उबेरचा चालक होता. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयामध्ये 21 जानेवारीला हा रूग्ण दाखल झाला होता. ताप, सर्दी आणि अशक्तपणा आल्याने उपचारांसाठी दाखल झाला. तो दाखल झाल्यानंतर चार ते पाच तासांमध्ये त्याला त्रास होऊ लागल्याने त्याला व्हेंटिलेटरवरती ठेवण्यात आलं होतं. त्याच्यावर योग्य प्रकारे उपचार करण्यात आले. एक्सरे केल्यानंतर लक्षात आलं रूग्णाच्या दोन्ही फुफ्फुसांमध्ये निमोनिया झाला आहे. त्या दृष्टीने उपचार करत असताना रूग्णाचा मृत्यू झाला आहे. 


तो रहिवासी पिंपळे गुरव भागातील आहे. मात्र, तो ओला-उबेरचा चालक असल्याने तो सकाळी घराबाहेर पडायचा. तो सर्वत्र फिरायचा त्यामुळे कोणत्या पाण्याने त्याला त्रास झाला याबाबतची माहिती नाही. तो ज्या ठिकाणी राहतो, त्या ठिकाणचे पाण्याचे नमुने तपासले मात्र, ते पाणी शुध्द असल्याचं दिसून आले होते. त्यामुळे तो फिरत असताना कोणत्या ठिकाणी पाणी पित होता, ते समोर आलं नाही. त्याचा भाऊ देखील ओला-उबेरचा चालक म्हणून काम करतो, अशी माहिती वैद्यकीय विभागाचे प्रमुख डॉक्टर लक्ष्मण गोफणेंनी दिली आहे. 


जीबीएस रोग म्हणजे काय?


GBS ही एक दुर्मिळ स्थिती आहे ज्यामुळे अचानक बधीरपणा आणि स्नायू कमकुवत होतात, ज्याच्या लक्षणांमध्ये हातपाय गंभीर कमजोरी, अतिसार इ. डॉक्टरांच्या मते, जीवाणू आणि विषाणूजन्य संसर्ग सामान्यत: जीबीएसला कारणीभूत ठरतात कारण ते रुग्णांची प्रतिकारशक्ती कमकुवत करतात आणि सध्याच्या परिस्थितीत, हा रोग दूषित पाण्यामुळे सुरू झाल्याचा संशय आहे.


काय काळजी घ्यावी


पाणी उकळून व गाळून प्यावे.
उघड्यावरील व शिळे अन्न खाणे टाळावे.
अचानकपणे हातापायाच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा जवळील शासकीय रुग्णालयात जावे.


कॅम्पिलोबॅक्टरमुळे जीबीएस कसा होतो?


दूषित पाणी किंवा अन्न खाल्यावर कॅम्पिलोबॅक्टर जेजुनीचा संसर्ग होऊ शकतो.
संसर्गामुळे अतिसार आणि ओटीपोटात वेदना होऊ शकतात.
काही व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती मज्जातंतूंना लक्ष्य करते. ज्यामुळे १ ते ३ आठवड्यांच्या आत जीबीएसचे निदान होते.
याशिवाय, डेंग्यू, चिकनगुनियाचे विषाणू किंवा इतर बॅक्टेरियाच्या संक्रमणामुळे मज्जातंतूंविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती हल्ला करते.


कॅम्पिलोबॅक्टर संसर्गाची लक्षणे


अतिसार
पोटदुखी
ताप
मळमळ किंवा उलट्या