पुणे: राज्यासह देशभरात चर्चेत आलेली वादग्रस्त ट्रेनी आयएएस आधिकारी पूजा खेडकर आणि कुटुंबिय यांच्यावर (IAS Probationers Pooja Khedkar) पोलिसांनी कारवाईला सूरूवात केली आहे. पोलिसांनी त्यांच्या घराबाहेर नोटीसा लावल्या आहेत, जेव्हा पोलिस त्यांच्या घरी कारवाईसाठी बाणेर भागातील बंगल्यात पोहोचले तेव्हा तिथे कोणीच नसल्याचं आढळून आलं आहे. त्याचबरोबर खेडकर कुटुंबाचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरु करण्यात आला असून खेडकर कुटुंबाशी संपर्क होत नसल्याचं पुणे पोलिसांनी म्हटलं आहे. खेडकर कुटुंब आणि त्यांच्यासह गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सात जणांचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथके तयार केली आहेत.
पौड पोलिसांच्या मदतीने खेडकर कुटुंबाचा शोध घेतला जात आहे. या सर्वांचे मोबाईल फोन देखील स्वीच ऑफ असल्याचं पोलीसांनी म्हटलं आहे. पुणे पोलिसांनी रविवारी खेडकर कुटुंबाच्या पुण्यातील बाणेर भागातील बंगल्यात जाऊन तपासण्याचा प्रयत्न केला. मात्र बंगल्याचे गेट बंद असल्याचे आढळूनआल्यानंतर पोलिसांनी या बंगल्याचे चित्रीकरण केले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांचे पथक खेडकर यांच्या बंगल्यावर पोहोचले मात्र तिथे कोणीच नसल्याचं निदर्शनास आल्यानंतर त्यांचा शोध घेण्यात येत आहे. त्यांचे फोन देखील बंद आहेत, त्यांचा ठावठिकाणा लागत नाही असंही पोलिसांनी म्हटलं आहे.
मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांना पोलिसांनी चौकशीसाठी उपस्थित राहावं असं म्हटलं होतं, पण ते दोघेही चौकशीसाठी गैरहजर राहिले. गेल्या दोनदिवसांपासून पुणे पोलिस त्यांच्या बंगल्यावरती जात आहेत मात्र तिथेही कोणीही नसल्याचं निदर्शनास आलं आहे.
याबाबत माहिती देताना पोलिस म्हणाले, आम्ही त्यांचा शोध घेत आहोत. त्यांचे मोबाईल देखील बंद आहेत. ते सापडल्यानंतर आम्ही कायदेशीर कारवाई करू. जो गुन्हा झाला आहे त्याबाबत आम्ही त्यांना काही प्रश्न विचारून माहिती घेऊ. एकूण 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील काहीचे मोबाईल नंबर आमच्याकडे नाहीत. त्या सर्वांचा शोध सुरू आहे. आम्ही त्यांचा शोध घेत आहोत.
खेडकर कुटुंबीयांचे पंकजा मुंडेंशी राजकीय संबंध? मुंडे प्रतिष्ठानला 12 लाखांची देणगी
खेडकर कुटुंबीयांचे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासोबत संबंध असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान या ट्रस्टला मनोरमा खेडकर यांनी 12 लाख रुपयांची देणगी दिल्याचं समोर आलं आहे. तीन ऑक्टोबर 2023 ला चेकद्वारे ही देणगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी, यासाठी दिलीप खेडकर यांनी पाथर्डीमधील मोहटा देवीला चांदीचा मुकुट देखील अर्पण केला होता. तसेच, दिलीप खेडकर यांचे भाऊ माणिक खेडकर हे पाच वर्षे भाजपचे पाथर्डी तालुका अध्यक्ष राहिलेले आहेत.
खेडकर कुटुंबीयांशी संपर्क होईना
खेडकर कुटुंबाचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला आहे. खेडकर कुटुंबाशी संपर्क होत नसल्याचं पुणे पोलिसांचं म्हणणं आहे. खेडकर कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सात जणांचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथकं तयार केली आहेत. पौड पोलिसांचं एक पथक खेडकर यांच्या घरी आज येऊन गेल्याची माहिती पौड पोलिसांनी दिली आहे.
मनोरमा खेडकर यांच्यावर पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने पौड पोलिसांचं एक पथक बाणेर रस्त्यावर असलेल्या खेडकर यांच्या घराची पाहणी करून गेलं. खेडकर कुटुंबानं कुठलाही प्रतिसाद न दिल्यानं पोलीस निघून गेले. त्यामुळे पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मनोरमा खेडकर यांनी पिस्टल ने शेतकऱ्यांना धमकावण्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर पौड पोलिसांनी मनोरमा खेडकर यांच्यासह काही जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पौड पोलीस यासंदर्भात मनोरमा खेडकर यांची चौकशी करण्यासाठी आले होते. त्यामुळे आता पोलीस पुढील काय कारवाई करणार हे पाहवं लागेल.
दरम्यान, वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रशिक्षण काळात बदल करण्यात आला आहे. तसेच, आठवडाभर वाशिम जिल्ह्यात वनविभाग आणि वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रशिक्षणाचा काळ घालवावा लागणार आहे.