पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुण्यात सुरु असलेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत सरकारमधून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी महामंडळाच्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे.


स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत पुण्यात कार्यकारिणीची बैठक सुरु आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना सत्तेतून बाहेर पडणार की नाही, याबाबतही या बैठकीत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

सरकारमध्ये राहण्यावरुन तीव्र भावना पदाधिकाऱ्यांनी बैठकीत व्यक्त केल्या. मात्र, राजीनाम्याबाबत अंतिम निर्णय खासदार राजू शेट्टी घेतील, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रकाश पोफळे यांनी सांगितले.

दरम्यान, रविकांत तुपकर यांनी वस्त्रोद्योग महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली असली, तरी तुपकरांनी त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे देऊ नये, अशी सूचना डॉ. प्रकाश पोफळे यांनी त्यांना केली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सदाभाऊ खोत यांच्या भूमिकेवरही संघटना आणि खासदार राजू शेट्टी यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सदाभाऊंबाबत कार्यकारिणीच्या बैठकीत काही निर्णय घेतला जातो का, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.