पुणे : सैराट फेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरू 10 वीनंतर पुढचं शिक्षण पुण्यातच घेणार आहे. पुण्यात काल बालगंधर्व रंगमंदिराच्या सुवर्णमहोत्सवा निमित्त खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी रिंकूनं ही माहिती दिली. या कार्यक्रमासाठी रिंकू, आकाश ठोसर, आणि नागराज मंजुळेही उपस्थित होते.

या कार्यक्रमात रिंकूची खास मुलाखत घेण्यात आली. मुलाखतकारांच्या प्रश्नांना तिनेही दिलखुलासपणे उत्तरे दिली. यावेळी तिने नुकतीच दहावी उत्तीर्ण झाल्याने पुढील शिक्षण कुठे घेणार असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा रिंकूनं पुण्यातील महाविद्यालयातच प्रवेश घेणार असल्याचं स्पष्ट केलं, मात्र ती कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घेणार याबाबतच निर्णय अद्याप तिचा झालेला नाही.

रिंकूला दहावीच्या परीक्षेत 66.40 टक्के मिळाले होते. सैराटच्या कान्नड भाषेतील रिमेकमुळे तिला जेमतेम दीड महिनाच अभ्यास करण्यास वेळ मिळाला होता. पण तरीही तिने दहावीच्या परिक्षेत घवघवीत यश मिळवल्याने तिच्यावर सर्वबाजूंनी कौतुकांचा वर्षाव होत होता.

दरम्यान, रिंकू राजगुरू ज्या कार्यक्रमाला जाते तिथे कार्यक्रमाच्या आयोजकांना बाऊन्सरही ठेवावे लागतात. काल बालगंधर्व नाट्य मंदिराच्या बाहेरही हेच चित्र बघायला मिळाले. रिंकूला पाहण्यासाठी बालगंधर्व नाट्य मंदिराबाहेर तरुणांनी मोठी गर्दी केली होती.