पुणे: शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून (Swabhimani Farmers Sanghatna) हाकालपट्टी करण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्याविरोधात भूमिका घेऊन संघटनेची हानी केल्याबद्दल रविकांत तुपकर यांची हकालपट्टी करण्यात येत असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून सांगण्यात आलं. त्यानंतर आज रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी पुण्यात महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडीची घोषणा केली आहे. तर आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रविकांत तुपकर 25 जागा लढवणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. पुण्यातील कार्यकर्ता बैठकीत रविकांत तुपकरांनी ही घोषणा केली आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात ते 6 जागा लढवणार आहेत. तर लवकरच राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
यावेळी बोलताना शेतकरी नेते रविकांत तुपकर म्हणाले, परवा जो धक्कादायक निर्णय स्वाभिमानीने माझा बाबत घेतला, संघटनेपासून मला वेगळं केलं, राजू शेट्टी यांची जी भूमिका होती ती ऐकून मला धक्का बसला. आज 4 तास आमची चर्चा केली आणि काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. अनेक वेळा मी जेल मध्ये गेलो, शेकडो पोलीस केस अंगावर घेतल्या लाठ्या काठ्या खाल्ल्या. २००७ मध्ये आम्ही राजू शेट्टी यांच्यासोबत आलो तेव्हा संघटना कोल्हापूर पर्यंत मर्यादित होती. आज संघटना नाव रूपाला आली आणि माझी गरज संपली.
त्याचबरोबर रविकांत तुपकर पक्षनेतृत्त्वावर टीका करत असून आमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आणि त्यांचा आता काहीही संबंध राहणार नसल्यचं संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी सांगितलं होतं. रविकांत तुपकर यांच्यावर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यावर बोलताना रविकांत तुपकर म्हणाले, जालिंदर पाटील यांच्या आरोपाला उत्तर देणे मला बंधनकारक आहे. लालबिल्ला तळ हाताच्या फोडासारखा सांभाळला आहे.
काय म्हणाले होते जालिंदर पाटील?
"लोकसभा निवडणूक तुपकर यांनी पक्षाच्या वतीनं लढवणं अपेक्षित होतं, तरीही ते अपक्ष म्हणून लढले. तरीही स्वाभिमानीचा एक कार्यकर्ते म्हणून शेट्टी यांनी पाठिंबा दिला होता. त्यानंतरही तुपकर यांनी शेट्टी यांच्यावर टीका करणं सुरूच ठेवलं होतं. ते मागील तीन ऊस परिषदेसह अन्य कोणत्याही कार्यक्रमला उपस्थिती राहिलेले नाहीत. तुपकर सातत्यानं पक्ष विरोधी कृत्ये करत आहेत. राजू शेट्टी यांच्या विरोधात वक्तव्य करत आहेत. त्यामुळे शिस्त पालन समितीसमोर उपस्थितीत राहून आपलं म्हणणं मांडण्याची नोटीस काढली होती. पण, ते शिस्त पालन समितीसमोर हजर राहिले नाहीत. त्यांनी परस्पर विधानसभेला विदर्भातील सहा जागा लढविण्याची घोषणादेखील केली.", स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील म्हणाले.
"आता ते स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी पक्ष काबीज करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे पक्ष आणि संघटनेतून त्यांची हकालपट्टी करण्यात येत आहे. यापुढे तुपकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी पक्षाशी कोणताही संबंध राहणार नाही", असं जालिंदर पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.