पुणे: आज पुण्यातील बालेवाडी परिसरात असलेल्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात भाजपची चिंतन बैठक पार पडणार आहे. या बैठकीच्या निमित्ताने अमित शाह (Amit Shah) हे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच भाजप हे आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग पुण्यातूनच फुंकणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या बैठकीला राज्यभरातील सर्व भाजप नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते असे जवळपास 5 हजार 300 पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. या बैठकीसाठी अनेक नेते उपस्थित आहेत मात्र या सर्व घडामोडींमध्ये विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) देखील दिसून आले, त्यांच्या उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात ते नेमके कोणाकडे आहेत अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत.


भाजपच्या अधिवेशनाला रणजितसिंह यांची हजेरी


नुकत्याच पार पडलेल्या माढा लोकसभा निवडणुकीमध्ये संपुर्ण मोहिते पाटील कुटूंब राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटात गेल्याच्या चर्चा सुरू होत्या. तर दुसरीकडे भाजपच्या कोट्यातून आमदार असणारे रणजितसिंह मोहिते पाटील अजूनही भाजपमध्ये असल्याचं दिसून येत आहे. आज पुण्यात पार पडणाऱ्या भाजपच्या अधिवेशनाला रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) यांनी हजेरी लावली. यावेळी माध्यमांनी त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष सक्रीय न राहता मुकप्रचार करत राष्ट्रवादी शरद पवार गटाला मदत केली होती, अशा चर्चा देखील सुरू होत्या. अशातच राज्यात विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर होणाऱ्या भाजपच्या बैठकांना ते उपस्थित राहात असल्याने राजकीय वर्तुळात विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) नेमकं कुणीकडे आहेत अशा चर्चा सुरू आहेत. त्याचबरोबर ते आगामी विधानसभेला नेमकं कुठं राहणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.


धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार गटात तर रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात


लोकसभा निवडणुकीवेळी माढा लोकसभा (Madha Loksabha) मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने मोहिते पाटील घराण्याला डावलून विद्यमान खासदार रणजित नाईक निंबाळकर यांना मैदानात उतरवलं होतं. त्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी नाराजीतून भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देत थेट शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रवेश करताच त्यांना माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली त्यांनी लोकसभा निवडणुकीत मोठा विजय देखील मिळवला. दरम्यान, या सर्व घडामोडींपासून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपूत्र आणि भाजपचे विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते (Ranjitsinh Mohite Patil) पाटील दूरच राहिल्याचं दिसून आलं. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी 2019 मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.