पुणे: महाराष्ट्राला लाभलेल्या महात्मा फुले, छत्रपती शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या समाज सुधारकांच्या मालेतील आजच्या काळातील ज्येष्ठ समाजसेवक, ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ बाबा आढाव (Baba Adhav Passed Away) यांचे 8 डिसेंबर रोजी रात्री रोजी 8.25 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. अखेर पर्यंत कार्यरत परिवर्तनाच्या चळवळीतील या समर्पित जीवनदानी नेत्याची समाज बदलासाठी केलेल्या दीर्घ संघर्षानंतर वयाच्या 95 वर्षी प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर आज (9 डिसेंबर मंगळवार) सायंकाळी 5.30वा. वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार (Baba Adhav Passed Away) केले जाणार आहेत. त्याआधी गुलटेकडी मार्केट यार्ड येथील हमाल भवन येथे सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी शिलाताई, मुले असीम व अंबर, सुना नातवंडे असा परिवार आहे. (Baba Adhav Passed Away)
स्वातंत्र्यलढा, संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन, आणीबाणी विरुद्धची चळवळ, एक गाव एक पाणवठा चळवळ, मनू पुतळा हटाव मोहीम, असंघटित वर्गातील कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळावी यासाठी पुणे ते दिल्ली सायकल मोर्चाचे आंदोलन या महत्त्वाच्या चळवळीचे ते अर्धयू होते. एक जून 1930 रोजी जन्मलेल्या डॉ.आढाव यांच्यावर राष्ट्र सेवा दलाचे संस्कार झाले होते. पितृछत्र लवकर हरपल्यावर त्यांची आई बबुताई यांनी अतिशय खंबीरपणे आपल्या सर्व मुलांना वाढवले. बाबा यांनी वैद्यकीय शिक्षणही पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय सेवेला प्रारंभ केला. कोणतेही काम अभ्यासपूर्ण व तळमळीने करण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे अल्पावधीतच ते 'चांगला हातगुण' असणारे डॉक्टर म्हणून हडपसर पंचक्रोशीत प्रसिद्ध झाले. मूळ समाजसेवकाचा त्यांचा पिंड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. त्यांनी हडपसर मध्येच डॉ. दादा गुजर, डॉ.गोपाळ शहा यांच्याबरोबर साने गुरुजी रुग्णालय सुरू केले. अतिशय अल्प दरात उत्तम उपचार देणारे रुग्णालय म्हणून साने गुरुजी रुग्णालय प्रसिद्धीला येऊ लागले.
मात्र डॉ. बाबा आढाव यांना आसपासची सामाजिक परिस्थिती स्वस्थ बसू देत न्हवती. पूर्ण वेळ सामाजिक कार्य करण्याचे त्यांना वेध लागले होते. वाढीला लागलेल्या या रुग्णालयातून ते सहज बाहेर पडले. ते राहत असलेल्या नाना पेठेतही ते दवाखाना चालवायचे. तिथे उपचारासाठी येणाऱ्या नाना भवानी गणेश या व्यापारी पेठे मधील हमालांच्या व्यथा वेदना या कष्टकरी रुग्णांना तपासता तपासता ते ऐकत. त्यांच्या व्यथा ऐकून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सत्तर वर्षांपूर्वी हमाल पंचायत संघटना त्यांनी स्थापन केली. हमाल पंचायत द्वारे त्यांनी उभे केलेले कष्टाची भाकर, हमाल नगर, हमाल भवन, हमाल पतसंस्था, कष्टकरी विद्यालय यासारखे रचनात्मक काम शब्दशः जगप्रसिद्ध आहे. या कामाचा अभ्यास करायला परदेशी विद्यापीठातूनही अभ्यासक पुण्यात येत असतात. तर बाबांच्या अंत्यदर्शनासाठी येणाऱ्या सर्व स्तरातील नागरिकांनी वरील ठिकाणी आणि वेळीच यावे इतर कोठेही गर्दी करू नये असे आवाहन आढाव कुटुंबीयांनी केले आहे.
Traffic Advisory: मार्केट यार्ड वाहतूक बदल
आज दिनांक ०९ डिसेंबर २०२५ रोजी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचे पार्थिव सकाळी १० वाजता ते सायंकाळी ०५ वाजेपर्यंत हमाल भवन मार्केटयार्ड येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे अंत्यदर्शनाकरीता मोठ्या प्रमाणात गर्दीची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊ शकते, त्यासाठी पुणे शहर वाहतून शाखेच्या वतीने विशेष सूचना देत कोणते मार्ग वापरावेत कोणते टाळावेल याच्या सूचना दिल्या आहेत.
कोणत्या मार्ग टाळाल, कोणत्या मार्गांचा वापर करालशक्यतो शिवनेरी रस्ता , मार्केट यार्ड याचा वापर टाळावापर्यायी मार्गाचा वापर करावा पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे.पर्याय मार्ग १) गंगा धाम चौक - नेहरू रोड - ७ लव्ह चौक मार्गे इच्छित स्थळी मार्ग २) गंगा धाम चौक - चंद्र लोक चौक - सातारा रोडने इच्छित स्थळी