MPSC Student Issue: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2021 मध्ये संयुक्त पूर्व परीक्षा घेतली होती. त्यात १३ हजाराहून अधिक विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र ठरले. मात्र याबाबत काही विद्यार्थ्यांनी आक्षेप घेत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे जानेवारीत होणारी मुख्य परीक्षा रखडली.
न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेली संयुक्त मुख्य परीक्षा 2020 च्या भरती प्रक्रियेचा प्रश्न तत्काळ सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच उर्वरित भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. राज्य सरकार आणि आयोगाने समन्वय साधून ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात दाखल करुन मुख्य परीक्षेची तारीख जाहीर करावी, अशी मागणी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी केली आहे.
तब्बल अडीच वर्षे उलटून गेली तरीही संबंधित भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. या कारणामुळे 22 व 29 जानेवारी 2022 रोजी नियोजित असलेली मुख्य परीक्षा न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेली आहे.उच्च न्यायालयात ही केस दिनांक 17/02/2022 रोजी दाखल केली. चार महिने उलटून देखील अद्याप एकही सुनावणी झालेली नाही. यामुळे सर्व उमेदवार प्रचंड मानसिक व आर्थिक तणावाने ग्रस्त आहेत.
राज्य सरकारने लोकसेवा आयोगाशी चर्चा करुन महाधिवक्त्याची नेमणूक करावी आणि 13 हजार विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात. विद्यार्थ्यांना अनेक समस्या आहेत. त्या समस्यांवर गेले अडीच वर्ष काहीही चर्चा झाली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक आणि आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. परीक्षेची तारीख जाहीर कमीत कमी वेळात जाहीर करा, असं मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे.
परीक्षा प्रक्रियेवर सुनावणी झाली नसल्याने 13909 विद्यार्थांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. एका विद्यार्थ्याचा 10000 रुपये प्रति महिना खर्च आहे. त्यामुळे आम्हाला मानसिक मनस्तापाबरोबरच आर्थिक अडचणीलाही तोंड द्यावे लागत आहे. आमच्यात अनेक विद्यार्थी शेतकरी कुटुंबातील आहे. शेतकऱ्यांच्या मुलांना न्याय मिळायला हवा यासाठी ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात दाखल करावी आणि निकाल लावावा, असं मत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मनोज पिंगळे याने व्यक्त केले आहे.