पुणे : देशातील मुरब्बी राजकारणी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सडेतोड आणि अभ्यासपूर्ण प्रश्न विचारत देशातील आणि राज्यातील सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली.

आरक्षण, समाजाला ढवळून काढणारं जातीय राजकारण , स्वतंत्र विदर्भ, मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचं षडयंत्र अशा राज ठाकरेंच्या थेट प्रश्नांना शरद पवारांनी अगदी विचारपूर्वक आणि सखोल उत्तरं दिली.

पाहा राज ठाकरेंनी शरद पवारांची घेतलेली मुलाखत जशीच्या तशी...

राज ठाकरे- महाराष्ट्रने देशाचा विचार केला पण महाराष्ट्राचा विचार झाला नाही

शरद पवार - राष्ट्र हे राष्ट्र आहे... महाराष्ट्राचा अभिमान आहे त्यासाठी योगदान देईन पण राष्ट्र विसरणार नाही, असा विचार केला पाहिजे

राज ठाकरे - तुमचा शिष्य तुमचं ऐकतो का?

शरद पवार - मोदी सतत मनमोहन सिंग यांच्यावर हल्ला करायचे.. काँग्रेसच्या नेत्यांच्या मनात राग होता.. त्यामुळे गुजरातचा प्रश्न आला की मी लक्ष घालायचो.. त्यामुळे मोदी दिल्लीत आले की माझ्या घरी यायचे, मोदींनी जे वक्तव्य केलं.. त्याला अर्थ नाही .. व्यक्तिगत सलोखा आहे

राज ठाकरे - पक्ष बदलले आत जाताना ,बाहेर पडताना काय विचार होते

शरद पवार - पक्ष सोडला काहीतरी कारण होती.. वाजपेयी सरकार गेलं.. मी किंवा मनमोहन सिंग यांना बोलवतील अपेक्षा होती पण काँग्रेस अध्यक्ष यांनी दुसर नाव सांगितलं. ते आवडलं नाही. पक्षाने घेतलेल्या निर्णय बद्दल टिव्हीवरून माहिती मिळाली.. संसदीय लोकशाहीत हे योग्य नव्हतं.. मनाला पटलं नाही.. आणि मी दूर झालो.

राज ठाकरे - महाराष्ट्र देशाचा विचार करतो, पण इतर राज्य देशाचा विचार करत नाहीत

शरद पवार - गुजरातचा अभिमान जरुर ठेवा, पण तुम्ही देशाचे प्रमुख आहात हे लक्षात ठेवा

राज ठाकरे - तुमचा शिष्य तुमचं ऐकतो का?

शरद पवार - मोदी म्हणतात मी पवारांच्या करंगळीला धरुन राजकारणात आलो, माझा त्यांच्याशी वैयक्तिक स्नेह आहे, पण राजकीयदृष्ट्या माझी करंगळी कधी त्यांच्या हाताला लागली नाही

राज ठाकरे - 1992, 93 मध्ये दंगली, त्यानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला पाठवलं. नरसिंहा राव आणि तुमच्यात काय बोलणं झाल?

शरद पवार - नरसिंह राव मला म्हणाले ज्या महाराष्ट्राने तुम्हांला मोठं केलं.. तीन वेळा मुख्यमंत्री केलं.. ते राज्य जळत असताना तुम्हांला जायचं नाही?.. हे ऐकल्यावर मी अस्वस्थ झालो.. आणि राज्यात परत आलो. पण महाराष्ट्रातली राजकीय व्यक्ती एका पातळीच्या पुढे जाऊ नये, याची काळजी घेणारे अनेक घटक दिल्लीत कार्यरत असतात.

राज ठाकरे - शिवाजी पार्कमध्ये एकत्र आलेले पवार, बाळासाहेब आणि जॉर्ज फर्नांडिस पुढे एकत्र राहतील, असं वाटलं होतं का?

शरद पवार - दत्ता सामंत यांनी संप केला.. गिरणगाव बंद पडला तर मराठी कष्टकरी माणूस उध्वस्त होईल..गिरण्या चालल्या पाहिजे यासाठी मतभेद सोडून एकत्र आले पाहिजे ही भूमिका बाळासाहेबांनी मांडली म्हणून मी, जॉर्ज आणि बाळासाहेब एकत्र आलो.

राज ठाकरे - बंगाली माणूस टागोरांमुळे एकत्र येतो, पंजाबी लोक गुरुनानक यांचं नाव घेतलं की एकत्र येतात, मराठी माणसाला असा कुठला हूक एकत्र बांधू शकेल?

शरद पवार - छत्रपती शिवाजी महाराज

राज ठाकरे - प्रत्येक महापुरुषाकडे काही जण जात म्हणून पाहतात, ते बदलावंसं वाटत नाही का? :

शरद पवार - यापुढे जातीयदृष्ट्या आरक्षण देऊ नये, जे आर्थिकदृष्ट्या मागास आहे त्यांनाच आरक्षण मिळालं पाहिजे. जात नाही, कर्तृत्व बघा, असा बाळासाहेबांचा संदेश, चंद्रकांत खैरेंसारखी व्यक्ती जातीधर्मापलिकडे जाऊन बाळासाहेबांनी पाहिली. बाळासाहेबांनी कधी जात पाहिली नाही, कर्तृत्व पाहिलं.

राज ठाकरे - महापुरुषांकडे त्यांच्या जातीने पाहिलं जातं

शरद पवार- शिवाजी महाराजांना जातीने पाहिलं जातं नाही

राज ठाकरे - शेतकरी आत्महत्या प्रमाण वाढत आहे, हे कसं थांबेल

शरद पवार - मी कृषीमंत्री असताना कॅबिनेट मध्ये सांगितलं धाडस करू,कर्जमाफी देऊ... 71 हजार कोटी कर्जमाफी दिली.. पुढच्या तीन वर्षात आत्महत्या प्रमाण कमी झालं.

राज ठाकरे - कर्जमाफी हा काही शाश्वत उपाय नाही

शरद पवार - कर्जमाफी हे उत्तर नाही.. पण उत्पादन वाढवण्यासाठी बाकी मदत केली पाहिजे शेतकऱ्यांना. नोटबंदी केली.. महाराष्ट्र ,गुजरात ,कर्नाटक मध्ये सहकारी बँकेत लोकांनी नोटा दिल्या पैसे मिळाले नाही..  तीन वेळा याबाबत प्रश्न उपस्थित केला.. हजार आणि पाचशे नोटा बदलून देणार नाही.. त्या नष्ट करा आणि बँकेने तो लॉस दाखवा.. अस पुणे सहकारी बँकेला पत्र आलं.

राज ठाकरे - अनेक मुख्यमंत्री विदर्भातून आले आहेत तरीही स्वतंत्र विदर्भाची मागणी का केली जाते?

शरद पवार - सामान्य मराठी माणूस वेगळ्या विदर्भाचा पुरस्कर्ता नाही. मी म्हंटल विदर्भासाठी लोकमत घ्यावं म्हणजे स्पष्ट होईल.. पण ते लोकमत कोणी घेतलं नाही.

राज ठाकरे - आपलं पंतप्रधान होण्याचं स्वप्न आजही आहे, देशाला मराठी पंतप्रधान मिळाल्यास मला सर्वाधिक आनंद होईल, पण त्यासाठीच तुम्ही क्रिकेटच्या राजकारणात प्रवेश केला होता का?

शरद पवार - मला क्रिकेटला वेगळी दिशा द्यायची होती मला देशाच्या आणि जगाच्या क्रिकेटचं नेतृत्व करायला मिळालं. मला सुरुवातीपासूनच सर्वच खेळांमध्ये रस होता. आम्ही आयपीएल सुरु केलं त्यातून बराच फायदा झाला. त्यातून आम्ही ज्येष्ठ क्रिकेटर्ससाठी आम्ही दरमहिना 50 हजार रुपये पेन्शन सुरु केली.

राज ठाकरे - मुंबई बाजूला करण्याचं षडयंत्र आहे का, बुलेट ट्रेन गरज नाही तरी प्रकल्प आणत आहेत

शरद पवार - आम्ही बुलेट ट्रेनला विरोध केला नाही.. पण ट्रेन करायची असेल तर दिल्ली मुंबई करा... अहमदाबाद- मुंबई करता.. तिथे कोणी जाणार नाही.. पण मुंबईची गर्दी वाढेल कोणी वरून खाली उतरलं तरी मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही.. वसई विरार पट्ट्यामध्ये मला आता जास्त गुजराती बोर्ड दिसतात..इतक्या मोठ्या प्रमाणावर गुजराती भाषेचं आक्रमण होतंय.

राज ठाकरे - मोदींबद्दल आधी काय मत होतं आता काय आहे?

शरद पवार - मोदी प्रचंड कष्ट करतात, सकाळी लवकर उठतात,जास्त वेळ कार्यालयात काम करतात.. मेहनतीची तयारी याचा फायदा त्यांना झाला. पंतप्रधानाला देश चालवायचा असेल तर त्याला टीम लागते.. टीमचा अभाव दिसून येतोय.. टीम म्हणून काम करताना आजचं नेतृत्व दिसत नाही

राज ठाकरे - तुमचे दिल्लीतले शिष्य जे आहेत, त्यांनी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करु असं म्हटलं होतं, त्याबद्दल तुमच्याशी काही चर्चा झाली का?

शरद पवार - नाही. संसदेत झाली. माझ्याशी वैयक्तिक चर्चा केली नाही.

राज ठाकरे - नरेंद्र मोदी हे मनमोहन सिंगांपेक्षाही मौनात असतात हो..!

शरद पवार - मनमोहन सिंग निर्णय घेत होते

राज ठाकरे - काँग्रेस, राहुल गांधींबद्दल तुमचं काय मत आहे?

शरद पवार - जुनी काँग्रेस आणि आताची काँग्रेस यामध्ये प्रचंड फरक. राहुल गांधींमध्ये चांगला बदल दिसतोय, मी त्यांना 10 वर्ष बघतोय. देशभर फिरुन, विषय लोक, मुद्दे जाणून घेण्याची त्यांची तयारी आता दिसतेय. ज्यामधलं आपल्याला समजत नाही ते समजून घेण्याचा राहुल गांधींचा सध्या प्रयत्न सुरु आहे, ही चांगली गोष्ट आहे हा बदल सकारात्मक आहे.  देशाच्या दृष्टीने एक मजबूत पक्ष असण्याची गरज आहे.. . इतर पक्ष छोटे पक्ष आहेत.. भाजपला पर्याय काँग्रेस देऊ शकते... हे नाकारता येणार नाही

राज ठाकरे - साहेब, महाराष्ट्रातला कुठला प्रश्न तुम्हाला चिंतेत पाडतो?

शरद पवार - जातीय तणाव, एकमेकांबद्दलचा विद्वेष वाढतोय हे खूप धोकादायक आहे. राजकारण बाजूला ठेऊन जात, धर्मातील कटुता बाजूला करण्यासाठी एकत्र आलं पाहिजे.

राज ठाकरे - कुठल्या नेत्याच्या निधनामुळे मनाला चटका?

शरद पवार - यशवंतराव चव्हाण गेल्यावर मला अस्वस्थ वाटलं.. दुसरे बाळासाहेब ठाकरे.. त्यांच्याकडे धाडस होत.. देश आणि राज्य त्यांनी प्रथम मानलं.

राज ठाकरे - मला असं कळलं की तुम्ही देव मानत नाही.

शरद पवार - बरं मग?

राज ठाकरे - राजकीय आयुष्यात कधी देव आठवलाय का?

शरद पवार - मला पंढरीत विठ्ठल, कोल्हापुरात अंबाबाईचं दर्शन घ्यायला मला आवडतं. मानसिक समाधान मिळतं, बरं वाटतं.

शरद पवार - मला राज ठाकरेंमागे राज्यातली सर्वात जास्त तरुण पिढी उभी राहताना दिसतंय. मला राजकीय अपयश वगैरे फार मानत नाही. ते येत जात असतं.

राज ठाकरे- आपल्यावर आरोप झाले पण आपण स्पष्टीकरण देत नाही.. त्यामुळे ते आरोप पक्के बसतात अस वाटतं नाही का

शरद पवार- आरोपांना मी महत्व देत नाही.. माझी दाऊद इब्राहिम आणि माझी दोस्ती.. आरोप झाला.. संबंध नाही.. राम नाईकांनी प्रश्न विचारला दाऊदचा भाऊ म्हणतो शरद पवार यांना ओळखतो.. याची चौकशी करावी.. या आरोपाबाबत आज एकही माणूस उभा राहिला नाही .. आरोप होतात.. अस्वस्थ वाटत... पण तथ्य नसेल तर दुर्लक्ष करावे.

रॅपिड फायर : यशवंतराव चव्हाण की इंदिरा गांधी?

या प्रश्नाचं उत्तर एका वाक्यात शक्य नाही, पवारांची प्रतिक्रिया

राज ठाकरे - शेतकरी की उद्योगपती

शरद पवार - शेतकरी

राज ठाकरे - मराठी उद्योगपती की अमराठी उद्योगपती?

शरद पवार - उद्योगपती

राज ठाकरे - महाराष्ट्र की दिल्ली?

शरद पवार - दिल्ली, महाराष्ट्र व्यवस्थित ठेवायचा असेल तर दिल्ली हातात पाहिजे.

राज ठाकरे - उद्धव ठाकरे की राज ठाकरे ?

शरद पवार - ठाकरे कुटुंबीय

VIDEO :

संबंधित बातम्या : 

राज ठाकरेंचे तुफान प्रश्न, शरद पवारांची सडेतोड उत्तरं