पुणे : राज्यभरात पुन्हा एकदा पावसाचा (Heavy Rain) वाढल्याचे दिसून येत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने पुढील 4 दिवस राज्यातील अनेक भागांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर, पुण्यातही आज विविध धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आज पुणे दौऱ्यावर असून पुणे दौऱ्यात त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांनी शनिवारी बैठक घेतली होती. या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याची माहितीही त्यांनी पुणेकरांना (Pune) दिली. तसेच, भिडे ब्रिज पुलाजवळ शॉक लागून मृत्युमुखी पडलेल्या मुलांच्या कुटुंबीयांनाही मदत देण्यात येत असल्याची माहिती राज ठाकरे यांनी दिली.  


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमध्ये मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास, पोलीस वसाहतींचा पुनर्विकास, घरांची उपलब्धता विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आहे. तर, पुणे शहरातीलही काही प्रश्न राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्‍यांपुढे मांडले. स्वत: राज ठाकरेंनी याबाबत माहिती दिली असून पुण्यातील कोणते प्रश्न मुख्यमंत्र्‍यांसमोर मांडले हेही राज ठाकरेंनी सांगितले.  


मुख्यमंत्र्यांसोबत माझी बैठक झाली. त्यावेळी मी महत्त्वाच्या 3 विषयांवर संवाद साधत प्रश्न मांडले. त्यामध्ये, मुळा-मुठा कोरिडोअरवरील बेकायदा बाबी बाजुला सारणे, दुसरा विषय होता तो रिडेव्हलपमेंटचा, या रिडेव्हलपमेंटसाठी म्हणजे जागा वाढविण्यासाठी मुख्यमंत्र्‍यांनी शब्द दिला आहे. एफएसआय वाढला तर रिडेव्हलपमेंट होऊ शकेल, ज्याप्रकारची पाऊले पुढील काही दिवसांत उचलली जातील. जवळपास 3 लाख नागरिक येथे राहतात, या नागरिकांसाठी रिडेव्हलपमेंट होईल, असे राज ठाकरे यांनी सांगितले. तसेच, तिसरा विषय हा पुण्यातील पूरस्थितीमध्ये जी वाहने पाण्यात गेली, त्यांना कंपन्या इन्शुरन्स देत नाहीत. त्यावर, मुख्यमंत्र्‍यांनी कालच पुणे महापालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना इन्शुरन्स कंपनींसोबत बोलून हा प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश दिल्याची माहितीही राज ठाकरेंनी दिली. 


संरक्षक भिंती अन् पीडित कुटुंबीयांस मदत


मुळा-मुठा कोरिडोअर प्रकल्पासाठी पुण्यातील नागरिकांची एक समिती करुन महापालिकेशी बोलूनच पुढील काय ते होईल, तोपर्यंत होमार नाही. विशेष म्हणजे येथील संरक्षक भिंती बांधण्यासाठी कालच ऑर्डरही देण्यात आली आहे. तसेच, शॉक लागून जी दोन मुले ठार झाली, त्यांच्या कुटुंबीयांसाठी मुख्यमंत्र्‍यांनी प्रत्येकी 10-10 लाख रुपयांचा चेक मुख्यमंत्र्‍यांनी कालच पाठवला आहे, तो आज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत त्यांना दिला जाईल. तर, त्यांच्या भावाला सरकारी खात्यात नोकरी देण्यात येईल,असेही राज ठाकरेंनी पुणे दौऱ्यात नागरिकांशी संवाद साधताना सांगितले. 


शॉक लागून मृत्यु झालेल्या मुलांच्या कुटुंबीयांस मदत


पुण्यात गेल्या आठवड्यात झालेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. दरम्यान, रात्री तीन वाजेच्या सुमारास भिडे ब्रिज परिसरातील झेड ब्रिज खालील नदी पात्रात पाण्याची पातळी अचानक वाढली. या ब्रिज खाली अंडा भुर्जी स्टॉलवर काम करणारे तीन इसम अंडा भुर्जी स्टॉल सुरक्षित ठिकाणी हलवण्याकरता गेले होते. त्यावेळी त्यांना विजेचा शॉक लागला. त्यांना पहाटे पाच वाजता उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र,  उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. अभिषेक अजय घाणेकर (25, रा. पुलाची वाडी, डेक्कन), आकाश विनायक माने (21, रा, पूलाची वाडी, डेक्कन) शिवा जिदबहादुर परिहार (18, नेपाळी कामगार) अशी मृतांची नावे आहेत. या कुटुंबीयांना आता शासनाने मदत देऊ केली आहे.