पुणे : पिंपरीतील साहित्य संमेलन असो की पिंपरी पालिकेकडे असलेली मोठी थकबाकी, प्रवेशासाठी देणग्या यांसारख्या वेगवेगळ्या विषयांवरून सतत वादात राहणाऱ्या डी. वाय. पाटील संस्थेचा ‘कारभार’ या छाप्यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे.   सलग चौथ्या दिवशी डी वाय पाटील शिक्षण संस्थेच्या साम्राज्यावर आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. नवी मुंबई, कोल्हापूर, पिंपरीतल्या संस्थेच्या कार्यालयात चार दिवसांपासून सुरु असलेल्या छापेमारीमुळे आयकर विभागाच्या हाती काय घबाड सापडलंय. याबद्दल प्रश्न उपस्थित केला जातो आहे.   एवढंच नाही तर शिक्षणसंस्थेचे सर्वेसर्वा पी. डी. पाटील यांच्या कोरेगाव पार्कमधील आलिशान घराचीही आयकर विभागानं झडती घेतली. फक्त संस्थाचालक नाही तर संस्थेचे खजिनदार, रजिस्टर , मुख्याध्यापकांच्या घरांची झाडाझडती घेतल्याची माहिती समोर येते आहे. वेगवेगळ्या संस्थामधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं आहे. यामध्ये कॉलेजमधून महत्वाची कागदपत्रं आणि इतर गोष्टी बाहेर नेताना सीसीटीव्हीत कैद झाल्या आहेत.   पिंपरी, आकुर्डी, कोल्हापूर, नवी मुंबई परिसरात डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचा मोठा पसारा आहे. डी.वाय. पाटील ह्यांच्या महाराष्ट्रात अनेक शिक्षणसंस्था आहेत. मुंबई, नवी मुंबई, पुणे, नागपूरमध्ये चार इंटरनॅशन स्कूल, मेडिकल, इंजिनिअरिंगच्या अनेक कोर्स संस्थेत शिकवले जातात.  
  • नवी मुंबई, पिंपरी, कोल्हापुरात मेडिकल आणि इंजिनिअरिंग कॉलेजचा विस्तार
  • डी.वाय. पाटील हॉस्पिटल, नवी मुंबई
  • डी.वाय. पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पुणे
  • डी.वाय. पाटील हॉस्पिटल, कोल्हापूर
  • नवी मुंबईत भव्य डी.वाय. पाटील स्टेडियम
  पण आयकर विभागाच्या छापेमारीमुळे डी वाय पाटलांचं साम्राज्य संशयाच्या भोवऱ्यात अडकलंय.   डी.वाय. पाटील यांच्या संस्था, त्यांचा कमी कालावधीत वाढलेला पसारा, त्यातील पैशांचे व्यवहार आणि संपत्ती सगळंच अजब आहे. सलग चार दिवसांपासून छापेमारीचं सत्र सुरु असतानाही आयकर बोलायला तयार नाही. कार्यालयं सील केली आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांना एन्ट्री नाहीए. त्यामुळं संशयाचं धुकं गहीरं झालं आहे.   डी.वाय.पाटील हे इंदिरा गांधींचे अगदी विश्वासू मानले जायचे. राजकारणात अपयश आल्यानंतर त्यांनी शिक्षण क्षेत्रात भलामोठा पसारा तयार केला. त्या जोरावरच त्यांना राज्यपालपदही मिळालं. विशेष म्हणजे मोदींचं सरकार आल्यानंतर काँग्रेसच्या एकट्या डी.वाय.पाटलांचं संस्थान खालसा झालं नाही. त्यामुळंच आयकरच्या छापेमारीवर चर्चांना ऊत आला आहे.