Pune Bypoll election :  मविआचे बंडखोर उमेदवार (Chinchwad Bypoll Election) राहुल कलाटे यांची शिवसेनेतून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी राहुल कलाटे  (Rahul kalate) यांचा पक्षाशी संबंध राहणार नसल्याचं म्हटलं आहे. बंडखोर राहुल कलाटे गटप्रमुख, नगर सेवक होते, यापुढे त्यांचा पक्षाशी काही संबंध राहणार नाही, असं (Sachin Ahir) सचिन अहिर म्हणाले. राहुल कलाटे यांनी पक्षप्रमुखांच्या फोननंतरदेखील उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे सचिन अहिरांनी त्यांना खडेबोल सुनावले आहेत. थोडक्यात शिवसेनेतून राहुल कलाटे यांची हकालपट्टी होण्याची शक्यता असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. 


सचिन अहिर म्हणाले की, निवडणुकीसाठी काळ खूप कमी आहे. गेल्यावेळी राहुल कलाटे यांना मिळालेली मते राष्ट्रवादीची आहेत. महाविकास आघाडीसोबत मतदार राहतील असा विश्वास आहे. बंडखोरी करणाऱ्या कलाटे यांचा विशेष प्रभागात (परिसरात) प्रभाव असू शकतो, त्यामुळे तिरंगी लढत होईल असे नाही. चिंचवडची निवडणूक प्रतिष्ठेची आहे म्हणूनच अनेक जण निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहे. आम्हाला आत्मविश्वास आहे, ओव्हर कॉन्फिडन्स नाही, आम्ही आदित्य ठाकरे यांचा रोड शो घेणार आहोत. महाविकास आघाडी आणि भाजपा अशी आमची लढाई आहे, असंही ते म्हणाले. राहुल कलाटे यांच्याबाबत अधिकचं बोलून आम्ही त्यांचा प्रचार आता करू इच्छित नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.


बंडखोरी केल्याने पक्षाकडून कारवाई


चिंचवड पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर राहुल कलाटे यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर महाविकास आघाडीत फुट पडल्याचं समोर आलं. त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रयत्न केला. विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार सुनील शेळके, शिवसेना नेते सचिन आहिर या तिन्ही नेत्यांनी राहुल कलाटे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील राहुल कलाटेंशी फोनवरुन संपर्क केला. त्यांनीदेखील उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी विनंती केली. मात्र राहुल कलाटेंनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. पक्षाचा आदेश न पाळल्यामुळे आता पक्षाकडून त्यांच्या कारवाई होण्याची शक्यता आहे. 


मीच जिंकणार; राहुल कलाटे


मी सगळ्यांचा आदर करतो. मात्र मी माझ्या समर्थकांचादेखील आदर करतो. 2019 ला समर्थकांनी आणि चिंचवडच्या जनतेनी मला लाखभर मतं दिली होती. त्यावेळी माझा पराभव झाला. मात्र यावेळी मी 100 टक्के जिंकणार, असा विश्वास राहुल कलाटे यांनी व्यक्त केला आहे. त्यासोबतच तिरंगी लढाई झाली तर त्याचा फायदा होणार असल्याचंही ते म्हणाले.