Pune Bypoll election :  पुण्यात पोटनिवडणुकीची (pune bypoll election) रणधुमाळी सुरु झाली आहे. कसबा आणि चिंचवड दोन्ही मतदारसंघाचे उमेदवार निश्चित झाले आहेत. आज निवडणूक अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यात संभाजी ब्रिगेड आणि आम आदमी पक्षाने पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा मार्ग सुकर झाला आहे. त्याच उलट आता कसब्यात भाजपचं टेन्शन वाढणार आहे कारण ब्राह्मण समाजाची नाराजी समोर ठेवून हिंदू महासंघाने उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि हिंदू महासंघाचे आनंद दवे हे कसब्यातून पोटनिवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत.


भारतीय जनता पक्षाकडू मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी नाकारली आणि ती हेमंत रासने यांना देण्यात आली. त्यानंतर ब्राह्मण समाज नाराज झाल्याच्या चर्चा रंगल्या. पुण्यात फ्लेक्स आणि सोशल मीडियावर याबाबत प्रतिक्रिया उमटताना दिसल्या. कोथरुडनंतर कसबा पेठ मतदारसंघात देखील ब्राह्मण समाजाला डावललं गेल्याची भावना या प्रतिक्रियांमधून उमटली. त्यापाठोपाठ ब्राह्मण समाज आणि संघटनांचे लोक टिळक कुटुंबीयांना भेटण्यासाठी टिळक वाड्यात देखील पोहोचले होते. ब्राह्मण समाजाला भाजपकडून गृहीत धरलं जात आहे, असं मत ब्राह्मण समाजातील लोकांनी व्यक्त केलं होतं. कसब्यात 13 टक्के ब्राह्मणांची मतं आहेत. ही सगळी मतं भाजपच्या उमेदवाराला मिळत होती. आता हिंदू महासंघाचा उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याने ही 13 टक्के मत विभागण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. 


महाविकास आघाडीला कसब्यात बंडखोरी रोखण्यात यश


महाविकास आघाडीला कसब्यात बंडखोरी रोखण्याचं आव्हान होतं. मात्र त्यांनी कसब्यात कॉंग्रेसच्या बाळासाहेब दाभेकर यांची समजूत काढून त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली होती. बाळासाहेबांना राहुल गांधींचा फोनदेखील आला होता. या फोननंतर बाळासाहेब दाभेकरांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतर संभाजी ब्रिगेड आणि आम आदमी पार्टीनेदेखील या पोटनिवडणुकीत उमेदवार रिंगणात उतरवले होते. शिवसेनेच्या सचिन अहिरांनी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतली. आम आदमी पक्षानेदेखील या पोटनिवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे महाविकास आघाडीचे मतं आता फुटणार नाही असं महाविकास आघाडीचं मत आहे. या सगळ्यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्याने महाविकास आघाडीचा मार्ग सुकर झाला आहे. त्यामुळे कसब्यात आता हेमंत रासने विरुद्ध रविंद्र धंगेकर अशी लढत बघायला मिळणार आहे.