वादग्रस्त पोस्टरवरुन एसएफआय आणि एबीव्हीपीमध्ये वाद, 9 जण ताब्यात
एबीपी माझा वेब टीम | 25 Feb 2017 07:42 AM (IST)
पुणे : पुणे विद्यापीठातील स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. सैनिकांबद्दलच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असलेल्या प्रशांत परिचारक यांच्या पोस्टरवरुन वाद झाला होता. त्यातूनच ही मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला. प्रशांत परिचारक यांच्या सैनिकांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी एसएफआयकडून छापण्यात आले होते. या पोस्टर्सवर भाजपचं नावही छापण्यात आलं आहे. एबीव्हीपी कार्यकर्त्यांचा निषेधाच्या पोस्टर्सवर भाजपचं नाव छापण्याला विऱोध होता. याच कारणावरुन एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचा आरोप एसएफआय कार्यकर्त्यांनी केला आहे. दोन्हीही संघटनांकडून एकमेकांच्या विरोधात पोस्टर्स लावल्याचा आरोप होत आहे. दोन्ही संघटनांनी एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी दोन्ही संघटनांच्या 9 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.