पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेचा झालेला दारुण पराभव शिवसेनेचे संपर्कप्रमुख आणि प्रख्यात अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे अमोल कोल्हेंनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे.


अमोल कोल्हे यांनी 2015 पासून शिवसेनेच्या पुणे आणि पिंपरी चिंचवड विभागाचं संपर्कप्रमुख पद सांभाळलं आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत शिवसेनेची झालेली पिछेहाट पाहून या पराभवाची नैतिक जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे.

'आदरणीय उद्धवसाहेब, आपण माझ्यावर विश्वास दाखवून फार मोठी जबाबदारी सोपवली होती. वेळोवेळी आपण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभेही राहिलात. परंतु आपला विश्वास सार्थ ठरवण्यात मी अपयशी ठरलो. इतर कोणालाही दोष न देता मी या पराभवाची जबाबदारी स्वीकारतो' असं पत्र कोल्हेंनी लिहिलं आहे.

2014 मधील विधानसभा निवडणुकांच्या वेळी कोल्हे शिवसेनेचे स्टार प्रचारक होते. डॉ. अमोल कोल्हेंच्या वक्तृत्वशैलीमुळे श्रोते त्यांच्या भाषणांना आवर्जून उपस्थित राहत. मात्र महापालिका निवडणुकांच्या वेळी कोल्हेंची जादू फारशी न चालल्याचं चित्र आहे.

डॉ. अमोल कोल्हे यांनी अनेक मालिका, चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. मात्र स्टार प्रवाह वाहिनीवरील राजा शिवछत्रपती मालिकेतील शिवरायांच्या भूमिकेमुळे ते नावारुपाला आले. कलर्स वाहिनीवर वीर शिवाजी ही त्यांची हिंदी मालिकाही गाजली होती.

पुणे महापालिकेत भाजपने मुसंडी मारली आहे. 162 पैकी 98 जागा मिळवत भाजपने निर्विवाद सत्ता स्थापन केली आहे. राष्ट्रवादीला 40, काँग्रेसला 11 तर शिवसेनेला 10 जागांवर समाधान मानावं लागलं. पिंपरी चिंचवडमध्येही शिवसेनेच्या वाट्याला 128 पैकी अवघ्या 9 जागा आल्या आहेत.