पुणे : पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली खरी, परंतु ज्या सात गावांमधे हा विमानतळ होणार आहे त्या गावांमधील ग्रामपंचायतींनी विमानतळाच्या विरोधात एकमताने ठराव संमत केले आहेत. त्याचबरोबर या सात गावांमध्ये महात्मा फुलेंच्या खानवडी या मूळ गावाचाही समावेश आहे. त्यामुळे महात्मा फुलेंच्या स्मारकाचं काय असा प्रश्नही स्थानिक विचारत आहेत.
कऱ्हेच्या खोऱ्यात छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाची घोषणा झाली आहे. त्यामुळे पुण्याजवळून थेट सातासमुद्रापार झेप घेता येईल. पुणे विमानतळाच्या विस्ताराच्या मर्यादा असल्यानेच पुरंदरच्या जागेला प्राधान्य देण्यात आलं आहे.
पुरंदर हे छत्रपती संभाजीराजे यांचं जन्मस्थान. या ऐतिहासिक स्थळापासून प्रस्तावित विमानतळाची जागा केवळ 15 किलोमीटरवर आहे. त्यामुळे विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे.
या विमानतळाला जवळपास 2400 हेक्टर जागा लागणार आहे. चार किलोमीटरच्या दोन धावपट्ट्या असतील. विमानतळामुळे उद्योग आणि शेती व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे. पण खानवडी, पारगावसह सात गावातील लोकांनी विमानतळाला विरोध सुरु केला आहे.
ज्या सात गावांचा विरोध आहे त्यात महात्मा फुलेंच्या खानवडी या मुळ गावाचाही समावेश आहे. त्यामुळे इथं असलेल्या महात्मा फुलांच्या स्मारकाचा मुद्दा संवेदनशील बनू शकतो.
पुरंदर तालुक्यात विमानतळ झालं तर गेल्या 30 वर्षांपासून धुळखात पडलेली मागणी पूर्ण होईल. पण त्यासाठी काही गावांमधून होणारा विरोध सरकारला दूर करावा लागेल. तसं झालं तर या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे कऱ्हेच्या खोऱ्याचा मात्र विकास होईल यात शंका नाही.