Party Filler Pune: पुण्यात सध्या पब (Pune Pub) कल्चर वाढताना दिसत आहे. अनेक परिसरात मोठ्या प्रमाणात पब आहेत. मात्र या पबमध्ये गर्दी वाढवण्यासाठी पुण्यातील महविद्यालयीन तरुणांचा वापर करण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांचा पबचालकांकडून पार्टी फिलर (party filler) म्हणून वापर करण्यात येत आहे, असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 


कोरेगाव पार्क, मुंढवा, बंडगार्डन, बाणेर, बालेवाडी या परिसरात मोठ्याप्रमाणात पब आहेत. पबमध्ये प्रवेश घेण्यासाठी अनेक प्रकारच्या सवलती दिल्या जातात. कपल एन्ट्री, फ्रि ड्रिंक शिवाय गर्ल्स नाईट यांसारख्या सवलतींना तरुणाई भाळून सध्या पब संस्कृतीकडे वळत आहे. पबमध्ये आलेल्या तरुणांना गर्दी दिसावी यासाठी विद्यार्थ्यांचा वापर केला जातो.


पबमध्ये प्रवेश घेण्यासाठी हजारो रुपये लागतात. त्यामुळे तरुणाईचा पबमध्ये जाण्याचा कल थोड्या प्रमाणात कमी दिसतो. याच विद्यार्थ्यांच्या काही शिक्षण संस्थेत पबचालकांनी काही एजंट नेमून दिले आहेत. ते एजंट विद्यार्थ्यांना केवळ 200 रुपयांमध्ये पबमध्ये एन्ट्री देतात. विद्यार्थ्यांनाही ही रक्कम परवडणारी असते. त्यांना आकर्षित करण्यासाठी विविध सवलतीसुद्धा देण्यात येतात आणि गर्दी वाढवण्यासाठी या विद्यार्थ्यांना वापर केला जातो.


शनिवारी 100 कपल्स पार्टीसाठी आणतात
शनिवार आणि रविवार या दिवशी पबमध्ये विशेष गर्दी करण्याचा पबचालकांचा प्रयत्न असतो. नामांकित पब चालकांना पार्टी फिलर तरुणांची फार गरज नसते. मात्र लहान-मोठ्या पब चालकांना गर्दी वाढवण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. शिवाय उत्तम इंस्टाग्राम पेज तयार करावा लागतो. त्यासाठी एजंट दर शनिवारी 100 कपल्स पार्टीसाठी आणतात. त्यांना फक्त 200 रुपये एन्ट्री फि आकारली जाते.


पार्टी फिलर म्हणजे काय? 
पबमध्ये फार मोठी जागा असते. अनेकांना नाचण्यासाठी फ्लोअर तयार करण्यात येतात. लाखो रुपये खर्च करुन इंटेरियर करण्यात येतं. याच पबमध्ये जागा मोकळी दिसू नये किंवा गर्दी असल्याचं चित्र निर्माण करण्यासाठी तरुणांना कमी पैशांमध्ये एन्ट्री दिली जाते. यासाठी खास पीआर नेमण्यात येतो. त्यांच्यामर्फत या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. पार्टीची रंगत वाढवण्यासाठी तरुणांना नशेच्या जाण्यात ओढण्यासाठी प्रयत्न असल्याचं दिसून येतं. 



पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. याच पुण्यात अनेक विद्यार्थी महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून शिक्षणासाठी येतात. विविध मोठ्या शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतात. शिक्षणासाठी हजारोंनी पैसे भरतात. पुण्यात अव्वल दर्जाचं शिक्षण दिलं जातं आणि शिवाय मोठमोठ्या शिक्षण संस्थादेखील आहेत. त्यामुळे पालकही मोठ्या उमेदीने आपल्या पाल्याला पुण्यात शिक्षणासाठी पाठवतात मात्र याच पुण्यात या विद्यार्थ्यांचा पार्टी फिलर म्हणून वापर करण्यात येत आहे.