Pune Crime News: पुण्यातील शिक्षकाने मुलीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पुणे झेडपीने प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाला निलंबित केले आहे. इयत्ता सहावीत शिकणाऱ्या मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी शिक्षकाला अटक केली आहे. चार महिन्यांपूर्वी या शिक्षकाने आणखी एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचे उघड झाले होते. मात्र त्यानंतर त्याला माफी मागून सोडून देण्यात आले होते. त्याच शिक्षकावर आता कारवाई करण्यात आली आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे (ZP) मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक (बारामती) मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी (बारामती), गटविकास अधिकारी विजयकुमार परीट आणि गटशिक्षणाधिकारी यांच्यासमवेत शाळेला भेट दिली. आम्ही शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत, शिक्षकांशी संवाद साधला. धक्कादायक घटनेनंतर काही त्रुटी राहिल्या असतील आणि त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज असेल तर कोणत्या प्रकरणाला कसं हाताळता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितलं.
एप्रिल 2022 मध्ये शाळेत ही एक घटना घडली होती. सध्याच्या प्रकरणातील आरोपी शिक्षक हा पूर्वीच्या प्रकरणातही आरोपी होता. मुख्याध्यापकांनी त्यांच्याकडून माफीनामा पत्र घेतले होते. एप्रिलमध्ये झालेल्या बैठकीत शाळा व्यवस्थापन समितीचे अनेक सदस्यही सहभागी झाले होते जिथे तक्रार न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मी तत्काळ मुख्याध्यापकांना माफीनामा पत्र तपास अधिकाऱ्याला देण्याच्या सूचना केल्या. पोलिसांना या प्रकरणाची दखल घ्यावी आणि एफआयआर नोंदवावा. प्रकरणाचा तपास करावा अशी विनंती केली आहे. त्या प्रकारे तपास केला आणि निलंबित केलं, असं प्रसाद यांनी सांगितलं. काही खाजगी लोकांनी पीडित मुलीशी संवाद साधला आणि घटनेबद्दल प्रश्न विचारल्याचेही समोर आले आहे. पोलिसांना विनंती केली आहे की लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या तरतुदीनुसार काही त्रुटी आहेत का ते तपासा, अशी विनंती देखील त्यांनी केली आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांची निर्भया टीमही नियमितपणे शाळेला सतत भेट देत होती. बाल संरक्षण अधिकारी आणि समुपदेशक यांना बोलावण्यात आले. ते शाळेत पोहोचले. ते पीडितांना आधार आणि समुपदेशन पुरवतील. शाळेतील सर्व मुलांशी संवाद साधून त्यांना सर्वतोपरी मदत करतील. मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात आले आहे. दुसऱ्या शाळेतील मुख्याध्यापकाला कार्यभार दिला जाणार असल्याचं सांगितलं.
केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी (शिक्षण) यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. शाळा व्यवस्थापन समिती बरखास्त करण्यात आली आहे. पालकसभेनंतर नवीन समिती स्थापन केली जाईल. घटनेनंतर झालेल्या त्रुटी शोधण्यासाठी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेली जिल्हास्तरीय समिती स्थापन केली जाईल. महिला आणि मुलांवरील कोणत्याही प्रकारच्या हिंसाचारालाबाबत प्रत्येक वेळी जेव्हा एखादी घटना नोंदवली जाते तेव्हा आम्ही कठोर कारवाई केली आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.