Pune Crime News : पुण्यात सध्या महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यातच पुणे पोलीस अनेक उपाययोजना राबवत असतानाच आता अज्ञात ठिकाणी घेऊन जात महिलांना लुटणारी नवी टोळी सक्रिय झाली आहे. आमच्या सोबत चला, तुम्हाला काम देतो, असे सांगून जुन्या कात्रज बोगद्याजवळ महिलांना लुटलं आहे. त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर चार जणांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 76 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


नितीन साहेबराव चव्हाण (वय 30), संतोष नागोराव कानोडे (वय 20), सुकलाल बाजीराव गिरी (वय 19 ) आणि सुनिल नारायण गिरी (वय 19) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी एका महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हे सगळे आरोपी मुळचे नांदेडचे आहेत. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 जुलै रोजी फिर्यादी महिला आणि तिचे सहकारी यांना चार अनोळखी व्यक्तींनी आमच्या सोबत कामासाठी चला असे सांगून चार चाकी गाडीतून जुन्या कात्रज बोगद्याच्या पलीकडे नेले. त्यानंतर प्रवासी गाडीतुन उतरुन डोंगराकडे जाणाऱ्या कच्या रस्त्यावर नेऊन तक्रारदार महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि मोबाईल हॅन्डसेट आणि रोख रुपये असा एकूण 76 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला. रस्ता सामसूम असल्याने महिलेला काहीही करता आलं नाही त्यानंतर महिलेने थेट पोलिसांत धाव घेतली. 


या प्रकरणी  महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करून चार आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरी केलेले दोन सोन्याचे मंगळसुत्र, दोन जोड कानातले असा एकूण 76 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.


विविध टोळ्या सक्रिय; पुण्यात महिला असुरक्षित?



मागील काही दिवसांपासून पुण्यात महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. दर्शना पवार हत्या प्रकरण त्यानंतर लगेच तरुणीवर कोयता हल्ला यामुळे पुण्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या दोन्ही प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी महिलांच्या संदर्भात विविध उपाययोजना राबवायचं ठरवलं आहे. रात्री शहरात गस्त घालण्यात येत आहे. गुन्हेगारांची धिंड काढण्यात येत आहे. मात्र अनेक प्रकार आता रात्रीच नाही तर दिवसाही घडताना दिसत आहे . 


हेही वाचा-