पोटच्या पोरीला नदीत फेकून आईचा अपहरणाचा टाहो
एबीपी माझा वेब टीम | 17 Aug 2017 05:36 PM (IST)
बाळ चोरीला गेल्याचा टाहो फोडत रेश्मा भर रस्त्यात बसली. धाय मोकलून रडू लागली. पोलिसांची यंत्रणा सतर्क झाली.
पुणे : तिनं अजून डोळेही उघडले नव्हते... तिला अजून नावाची ओळखही नव्हती... तिला अजून या जगाची रीतही कळली नव्हती... त्याआधीच तिला मृत्यूच्या मिट्ट अंधारात परत पाठवलं... तेही तिच्या जन्मदात्रीनंच... कुणाच्याही काळजाचं पाणी पाणी करणारी ही घटना भर पुण्यातली आहे... भर दिवसा घडलेली आहे. रुग्णालयातून दहा दिवसांच्या बाळाला घेऊन रिक्षाने घरी निघालं असताना पुणे आणि पिंपरी चिंचवडला जोडणाऱ्या हॅरिस पुलाखाली सहप्रवासी महिलेने रिक्षातून बाहेर ढकललं, असा बनाव रेश्मा शेखने केला. ती महिला रिक्षाचालकासह आपल्या बाळाला घेऊन पळून गेल्याचा दावा तिने केला. या घटनेने शहरात खळबळ माजली.