पुणे : लकी ड्रॉ मध्ये टीव्ही, फ्रीज आणि गाडी लागल्याचं सांगून पुण्यात एका महिलेला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. पत्ता देण्याच्या बहाण्याने दुचाकी आणि सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना आंबेगाव पठार परिसरात घडली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.


मधुमती खेदाड गेल्या सहा महिन्यांपासून कात्रज सातारा बायपासला चहाची टपरी चालवतात. या ठिकाणी एक अज्ञात व्यक्तीने येऊन तुम्हाला लकी ड्रॉ मध्ये टीव्ही, फ्रिज, गाडी लागल्याचं सांगून महिलेची फसवणूक केली.

27 नोव्हेंबर रोजी एक व्यक्ती चहाच्या टपरीवर आली. दुकानातील गोळ्यांच्या लकी ड्रॉमध्ये तुम्हाला टीव्ही लागला असल्याचे सांगून त्याने महिलेकडे पत्ता मागितला. मात्र महिलेला घराचा पत्ता सांगता येत नव्हता. त्यामुळे महिला त्याला आपले घर दाखवण्यासाठी तिच्या दुचाकीवरून घरी घेऊन गेली. त्या व्यक्तीने घर पाहिले. त्यानंतर एका शोरुमध्ये जाऊन त्यांनी टीव्ही पाहिला. त्यानंतर ते परत चहाच्या टपरीकडे निघाले.

त्यावेळी दोघांनी एका पेट्रोल पंपावर दुचाकीत पेट्रोल भरले. पेट्रोल भरल्यानंतर या अनोळखी व्यक्तीने महिलेला ‘टीव्ही घेण्यासाठी ओळख द्यावी लागते. त्यासाठी तुम्ही तुमच्या कानातील दागिने काढून द्या. त्यावरुन मी सराफाची पावती आणतो असे सांगून सोन्याचे 20 हजार रुपयांचे दागिने व दुचाकी घेऊन गेला. मात्र, तो परत आलाच नाही.

महिलेने बराच वेळ वाट पाहिली, मात्र तो येत नसल्याचे समजल्यानंतर महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोलिसांकडे धाव घेऊन घटनेची माहिती दिली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस अधिक तपास करत आहेत. महिलेला आरोपी ज्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला गाडी घेऊन गेला, त्या ठिकाणचे सीसीटीव्ही काढून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मात्र अशा आमीषाला कोणी बळी पडू नये अस आवाहन पोलिसांनी केलं आहे.