Pune Weather Update :  मागील काही दिवसांपासून पुण्यात  (Pune Temperature) सकाळी गारठा आणि दुपारी उन्हाचा तडाखा जाणवत आहे. दुपारी सगळ्या शहरात तापमानात वाढ होत आहे. मात्र आता पुणेकरांना या उन्हापासून काही प्रमणात सुटका मिळण्याची शक्यता आहे. पुण्यात आणि बाकी ग्रामीण परिसरात पुढील दोन दिवसानंतर वीज आणि पावसाच्या सरींची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 


मागील काही दिवस अनेक शहरांमध्ये अवकाळी पाऊस झाला आहे. सध्या पश्‍चिमेकडून येणारे बाष्पयुक्त वारे, तसेच वाऱ्यांच्या प्रभावामुळे उत्तर प्रदेश, विदर्भ, मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे शहरात आणि ग्रामीण परिसरात पावसासाठी योग्य वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे शहरात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता आहे.


पुणेकरांची उष्णतेपासून सुटका


पुढील दोन दिवसानंतर पुणेकरांची उष्णतेपासून सुटका होणार आहे. उन्हाचा चटका काही प्रमाणात कमी होणार आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्यात आणि ग्रामीण परिसरात काही प्रमाणात पावसाने हजेरी लावली होती.  विजांच्या कडकडाटासह, वादळी वारे देखील होते. त्यात संध्याकाळच्यावेळी पुण्यात ढगाळ वातावरणदेखील मागील दोन दिवसांपासून आहे. अचानक तापमानात वाढ झाली होती. शुक्रवारी शहरात 15.8 अंश सेल्सिअस किमान आणि 33.8 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. आता पावसाची शक्यता वर्तवल्याने पुणेकरांची उष्णतेपासून सुटका होणार आहे. 


उन्हामुळे पुणेकर हैराण


पुण्यात फेब्रुवारीमध्ये 147 वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली होती. मागील काही दिवसांपासून (Pune Temperature) सकाळी थंडी आणि दुपारी कडाक्याचं ऊन असं वातावरण आहे. त्यामुळे पुणेकरांनी चांगलीच दमछाक होत आहे. यामुळे अनेक पुणेकरांना ताप, सर्दी, खोकल्याचा त्रास होत आहे. त्यामुळे निम्मे पुणेकर काही प्रमाणात आजारी असल्याचं दिसून आलं आहे. त्यात पुण्यात उन्हाचं प्रमाणही चांगलंच वाढलं आहे. पुण्यात फेब्रुवारीमध्ये 147 वर्षांतील सर्वाधिक तापमान नोंदवलं गेलं. येत्या काळात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत शहराचे तापमान 38 अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे, असं हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. देशाच्या उत्तरेकडील भागातून उष्ण वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहताना वाऱ्याची दिशा बदलल्याने तापमानात अचानक वाढ झाली आहे.


शेतकरी चिंतेत 


मागील काही दिवस महाराष्ट्रात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. आता दोन दिवस पुणे जिल्ह्यात पावसाची शक्यता सांगितल्याने जिह्यातील शेतकरी चिंचेत आहे.