पुणे : पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीत भाजपचे (BJP) हेमंत रासने (Hemant Rasane) आणि काँग्रेसचे (Congress) रविंद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar) यांच्यात तगडी लढत झाली. या निवडणुकीदरम्यान आणि प्रचारादरम्यान दोघांनीही एकमेकांवर जोरदार ताशेरे ओढले. दोघांनीही विजयाचा विश्वास दाखवला होता. मात्र त्यात रविंद्र धंगेकरांनी मोठ्या मताधिक्यानं बाजी मारत हेमंत रासणे यांचा पराभव केला. या सगळ्या घडामोडींनंतर आमदार रविंद्र धंगेकरांनी विधानसभेत शपथ घेतली आणि शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी होमग्राऊंड गाठलं. विजयानंतर त्यांनी पहिल्यांदाच हेमंत रासने यांच्यावर भाष्य केलं आहे. आमच्यातील राजकारणाचं युद्ध संपलं असून आता समाजकारणाचं युद्ध सुरू झालंय, आम्ही हातात हात घालून सोबत लढू, गेले पंधरा वर्ष आम्ही सभागृहात सोबत काम केले आहे, असं म्हणत त्यांनी त्यांनी महापालिकेतील सोबतीची आठवण करून दिली.  


कसब्याची पोटनिवडणूक राज्यभरात चांगलीच रंगली. या पोटनिवडणुकीनंतर पहिल्यांदाच काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर आणि हेमंत रासने आमने-सामने येणार होते. पुण्यातील शिवजयंतीच्या कार्यक्रमात त्यांनी भेट होणार होती. मात्र रविंद्र धंगेकर यांना कार्यक्रमाच्या स्थळी यायला काही वेळ उशीर झाल्याने दोघांची भेट हुकली. निवडणुकीनंतर पहिल्यांदाच दोघे जण आमने-सामने येणार होते. त्यामुळे या दोघांच्या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.


यावेळी धंगेकरांना भेट हुकल्याचं विचारलं असता, आता आमचं राजकारणाचं युद्ध संपलय, आता समाजकारणाचं युद्ध सुरू झालं आहे, अशी प्रतिक्रिया दिली. "मी स्वतःला भाग्यवान समजतो की राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहुर्तमेढ जिथे रोवली आहे, त्या भागाचा मी आधी नगरसेवक होतो आणि आता आमदार म्हणून निवडून आलो आहे. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार घरातूनच मिळाले आहेत. लहानपणापासून घरात, शाळेत आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शिकवले आहेत. आमचं जीवनच जयभवानी जय शिवाजीचा जयघोष करत सुरु झालं आहे, असंही आमदार धंगेकर यावेळी म्हणाले.


या शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी दरवर्षी मी हजर असतो. आजपर्यंत ही वारी चुकली नाही. आज थेट विधानसभेतून आलो आहे.  दरवर्षी भवानी माता मंदिरपासून मिरवणुकीला सुरुवात होते, त्या ठिकाणी मी आजही उपस्थित आहे. सामाजिक कामात मी राजकारण आणणार नाही, असंही यावेळी आमदार रविंद्र धंगेकर यांनी स्पष्ट केलं आहे. 


महत्वाच्या बातम्या 


Ravindra dhangekar : शपथविधीपूर्वी धंगेकरांचा चंद्रकांत दादांना नमस्कार; सभागृहात घुमल्या 'हु इज धंगेकर'च्या घोषणा