पुणे : मागील काही दिवस उन्हाच्या झळा सोसल्यानंतर पुणेकरांना  (Pune Weather Update)  काहीसा दिलासा  मिळाला आहे. आकाश निरभ्र झाल्याने उत्तरेकडून थंड वारे वाहू लागल्याने पुणे शहरातील किमान तापमानात घट झाली. भारतीय हवामान (Weather Forecast) खात्याच्या आकडेवारीनुसार, सोमवारी 4 मार्च रोजी शिवाजीनगर येथे सकाळचे तापमान 13 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.


गेल्या 24 तासांत तापमानात 3 अंशांची घट झाली असून आयएमडीच्या अंदाजानुसार येत्या 2-3 दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे.गेल्या 5 ते 6 दिवसांपासून शहरात तापमानवाढीमुळे उन्हाचा तडाखा जाणवत आहे. देशातील हवामानातील अस्थिरतेचा परिणाम पुण्यातील हवामानावर झाला आहे. या दरम्यान 24 तासांत शहराच्या किमान तापमानात 8 अंशांची वाढ झाली. 20 मार्च रोजी 20 अंश तापमानाचा अनुभव घेतल्यानंतर पुण्याच्या किमान तापमानात हळूहळू घट जाणवू लागली. 3 मार्च रोजी तापमान 16 अंश सेल्सिअस नोंदले गेले होते. 24 तासांत त्यात तीन अंशांची घसरण होऊन तो १३ अंशांवर पोहोचला. शिवाजीनगरमध्ये किमान तापमान सरासरीपेक्षा 1 अंशांनी कमी होते.


सध्याची हवामान स्थिती आणि अंदाजाबद्दल बोलताना आयएमडी, पुणे येथील हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी म्हणाले, "सध्या पुण्यात आकाश निरभ्र आहे आणि  शहराच्या किमान तापमानात घट होत आहे. पुढील दोन ते तीन दिवस ही स्थिती कायम राहणार असून या कालावधीत तापमानात 4 ते 5 अंशांनी घट होण्याची शक्यता आहे. एक अंकी तापमानाची शक्यता नाकारता येत नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील काही भागात किमान तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे.


आयएमडीच्या आकडेवारीनुसार, शिरूर आणि लोणावळा परिसरात 10.7 आणि 10.9 अंश तापमानाची नोंद झाली. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव (11.3), हवेली (11.5), नारायणगाव (11.6), माळीण (11.6) आणि एनडीए (11.9) या पाच ठिकाणी तापमान 11 अंशांच्या दरम्यान होते.


राज्यावर आजही अवकाळी पावसाचं सावट


महाराष्ट्रात अनेक भागात वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, आजही मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम आहे. काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट होण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे. पावसामुळे थंडीत वाढ झाली असून काही भागात धुक्याची चादर परसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, पुढील 24 तासांत अमरावती, नागपूर, अकोला, बुलढाणा, परभणी, बीड, हिंगोलीसह पुण्यात पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.


इतर महत्वाची बातमी-


Baramati Lok Sabha Constituency : युगेंद्र पवार काकाची साथ सोडून आत्याच्या प्रचारासाठी मैदानात; बारामतीचं राजकारण तापलं