Pune Water Crises: पाण्याच्या कमतरतेमुळे पिंपरी चिंचवड शहरात बऱ्याच ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. शहरवासीयांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळत नसल्याने पालिकेवर मोर्चा काढला. नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहे. याबाबत  मार्ग काढण्यासाठी या मोर्चात नागरिकांनी सहभाग घेतला होता. 


राज्यात एकीकडे सत्तसंघर्ष सुरु आहे तर  पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला सध्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जून महिना संपत आला तरीदेखील राज्यासह पुण्यात पुरेसा पाऊस पडला नाही आहे. त्यामुळे अनेक शहरांमध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यातच पुणे महापालिकेत अनेक गावांचा समावेश देखील झाला आहे.


हा प्रश्न घेत पिंपरी-चिंचवडकरांच्यावतीने महापालिकेसमोर हांडा मोर्चा काढण्यात आला. त्यात अनेक नागरिकांनी आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. दोन दिवस शहरात पाणी कपातीच्या चर्चा सुरु आहेत. यावर महापालिकेकडून तोडगा काढण्यात येत नसल्याने नागरिक संतापले आहेत. त्यामुळे त्यांनी हांडा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला.


झाकण नसल्याने लाखो लीटर पाणी वाया
हडपसर औद्योगिक वसाहतीमध्ये पाण्याच्या टँकर भरून देण्यासाठी महापालिकेने पॉईंट उपलब्ध करून दिलेले आहेत. या पॉईंटमधूनच लाखो लिटर पाणी वाया जात आहे. टँकरमध्ये पाणी भरून झाल्यानंतर दुसरा टँकर त्याठिकाणी येईपर्यंत हे पाणी अव्याहतपणे सुरू असते.पाणी बंद करण्यासाठी त्याला कॉक नाही. त्यामुळे महापालिकेचा भोंगळ कारभार समोर आला आहे.


पुण्यात एकीकडे पाण्यासाठी लोकांची फरपड सुरु आहेत तर दुसरीकडे लाखो लीटर पाणी वाया जात असल्याचं समोर आलं आहे. याबाबत महापालिकेने तात्काळ उपाययोजना करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडावे लागेल असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिलाय.


पुण्यात सहा तालुके टँकरमुक्त आहेत
या उन्हाळ्यात आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये एकही टँकर सुरू झालेला नाही. त्यामुळे हे तालुके आता टँकरमुक्त तालुके म्हणून ओळखले जात आहेत.महत्वाचं म्हणजे या तालुक्यांमध्ये इंदापूर आणि दौंड या दोन तालुक्यांचा समावेश आहे जिथे पूर्वी टँकरचा वापर केला जात होता. तसेच हवेली, मावळ, मुळशी व वेल्हे तालुके टँकरमुक्त झाले आहेत.