Pimpri-Chinchwad News: पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना बंडखोर एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ फ्लेक्स लागला पण काही वेळातच मुख्यमंत्री ठाकरे समर्थकांनी तो फ्लेक्स फाडून टाकला. महापालिके समोरील चौकात हा फ्लेक्स आजच लागला होता, 'आम्ही एकनाथ शिंदे साहेब समर्थक' असा आशय त्यावर होता. याची कल्पना ठाकरे समर्थक शिवसैनिकांना मिळताच, त्यांनी काही वेळातच फ्लेक्स फाडला. यामुळं काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


कालच पुणे जिल्हा संपर्क प्रमुख आणि विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार सचिन अहिर शहरात आले होते. उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी आयोजित मेळाव्यात अहिरांनी उपस्थिती लावली. शहरातील शिवसैनिकांनी एकजुठीने ठाकरेंच्या पाठीमागे उभ राहायचं, असा निर्धार करण्यात आला. मात्र त्यानंतर चोवीस तासाच्या आतच एकनाथ शिंदे समर्थनार्थ फ्लेक्स लागला अन तोच फ्लेक्स उद्धव ठाकरे समर्थकांनी फाडून टाकला. या प्रसंगामुळं शहरात ही ठाकरे विरुद्ध शिंदे असा संघर्ष सुरु झाल्याचं पहायला मिळत आहे.


मला गुवाहाटीला बोलवत नाही: सचिन अहिर
सध्या आपल्याला कोणी गुवाहाटीला बोलवत नाही. कारण त्यांना गरजच नाही. असं वक्तव्य शिवसेनेचे विधानपरिषदेतील नवनिर्वाचित आमदार सचिन अहिरांनी केल्याचं समोर आलं आहे. हे वक्तव्य करताना त्यांचा सूर हा मिश्किलतेचा होता. मात्र सध्या जो मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत असणारी व्यक्ती उद्या त्यांच्या गटात असेलच का? याची खात्री कोणी देत नाही आहे. म्हणूनच सचिन अहिरांच्या या वक्तव्याला घेऊन तर्क-वितर्क् लढवले जात आहेत.


बंडखोर आमदारांची रुग्णवाहिकेमधून 'अंतयात्रा' 


शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या विरोधात राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे.आज हडपसर गाडीतळ ते अमरधाम स्मशानभूमीपर्यंत बंडखोर आमदाराची पाच रुग्णवाहिकेमधून अंत्ययात्रा काढत, प्रतिकात्मक अंत्यसंस्कार देखील करण्यात आले. शिवसेनेचे नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील सहा दिवसापासून शिवसेनेविरुद्ध बंड पुकारले आहे. यामुळे राज्यामधील सत्तासंघर्ष अधिक तीव्र झाल्याचे चित्र दिसत आहे.एकनाथ शिंदेंनी आपल्याकडे 46 आमदारांचा पाठिंबा असल्याचं दावा केला असून उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याची मागणी केली आहे. त्यामुळे राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळत आहे