पुणे : कोंढवा दुर्घटनेप्रकरणी अटकेत असलेल्या विपुल अग्रवाल आणि विवेक अग्रवाल या दोघांना दोन तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  पुण्यातील कोंढवा भागात सोसायटीची संरक्षण भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकूण 15 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते.  या दुर्घटनेप्रकरणी दोन्ही बाजूच्या बिल्डरांसह एकूण 14 जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संरक्षण भिंत कोसळून या घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशीचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.


कोंढव्यातील दुर्घटनेप्रकरणी अटक केलेल्या विपुल आणि विवेक अग्रवाल या बांधकाम व्यावसायिकांना पुणे सत्र न्यायालयात आज हजर करण्यात आले.  आरोपींनी भिंत 2013 साली बांधली. मात्र मोडकळीस आल्यानं या प्रकरणी अल्कॉन सोसायटी सदस्यांनी अटक आरोपी आणि भागीदार यांना पत्रव्यवहार केला होता. मात्र कार्यवाही झाली नाही.

या आरोपींकडून इमारत बांधकाम नकाशे, परवानगी, आरोपीकडून प्राप्त करायची आहेत. भिंतीचा ठेका आरोपींनी कोणास दिला होता, याबाबत तपास करायचा आहे. अटक आरोपी इतर आरोपींचा पत्त सांगण्यास टाळाटाळ करत आहेत. भिंत अधिकृत की अनधिकृत याबाबत देखील तपास करायचा आहे. या गुन्ह्यात आणखी आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता असून अटक आरोपींकडून तपास करायचा आहे. अटक आरोपींकडून इमारत आणि भिंतीची परवागी कागदपत्रे तपास करायचा आहे. या विविध मुद्द्यांवर तपास करायचा असल्यानं पोलिसांनी दहा दिवस पोलीस कोठडी मागितली होती. यानंतर न्यायालयाने विपुल अग्रवाल आणि विवेक अग्रवाल यांना दोन तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणातील आणखी 12 आरोपी फरार आहेत.

दरम्यान, आरोपीचे वकील संजय अगरवाल यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना ही दुर्घटना जमीन ढासळल्यामुळे घडली. त्यामुळे बांधकाम व्यासायिकाची यामध्ये चूक नाही. त्यांनी केलेलं बांधकाम अधिकृत आहे. त्याची कागदपत्रे उपलब्ध आहेत. काही चौकशी करायची असल्यास ते पोलिसांना सहकार्य करतील. त्यामुळे त्यांना पोलीस कोठडी देण्यात येऊ नये अशी मागणी केली होती.

पुणे पोलिसांनी याप्रकरणी बांधकाम सुरु असलेल्या कांचन डेव्हलपर्सचे पंकज व्होरा, सुरेश शहा, रश्मीकांत गांधी या बिल्डरांसह साईट इंजिनीअर, साईट सुपरवायझर आणि मजूर पुरवणारा कंत्राटदार अशा सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर भिंत कोसळलेल्या आल्कन स्टायलस लॅंडमार्कस् या बांधकाम संस्थेच्या पाच भागीदार बिल्डरांसह एकूण आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये जगदीशप्रसाद अग्रवाल, सचिन जगदीशप्रसाद अग्रवाल, राजेश जगदीशप्रसाद अग्रवाल, विवेक सुनिल अग्रवाल, विपूल सुनील अग्रवाल यांच्यासह साईट इंजिनिअर, साईट सुपरवायझर, कंत्राटदार यांचा समावेश आहे.

कशी घडली घटना ?

पुण्यातील बडा तालाब मस्जिद परिसरात आल्कन स्टायलस या सोसायटीच्या संरक्षण भिंतीला लागून दुसऱ्या इमारतीचं बांधकाम सुरु होतं. या बांधकामासाठी असलेल्या मजुरांनी आल्कन स्टायलस या सोसायटीच्या संरक्षण भिंतीला लागून झोपड्या उभारल्या होत्या. काल (शुक्रवार) दिवसभर पडलेल्या पावसामुळे सोसायटीची संरक्षण भिंत खचून मजुरांच्या कच्च्या घरांवर कोसळली. त्यामध्ये 15 मजुरांचा मृत्यू झाला आहे.

मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांची मदत

दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदतीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच बहुतांश मजूर महाराष्ट्राबाहेरील असल्याने सर्वांचे मृतदेह त्यांच्या गावी पोहोचवण्याची सोय करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या