पुणे : पुण्यातील कोंढवा भागात सोसायटीची संरक्षण भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी दोन्ही बाजूच्या बिल्डरांसह एकूण 14 जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संरक्षण भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकूण 15 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशीचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.


पुणे पोलिसांनी याप्रकरणी बांधकाम सुरु असलेल्या कांचन डेव्हलपर्सचे पंकज व्होरा, सुरेश शहा, रश्मीकांत गांधी या बिल्डरांसह साईट इंजिनीअर, साईट सुपरवायझर आणि मजूर पुरवणारा कंत्राटदार अशा सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


तर भिंत कोसळलेल्या आल्कन स्टायलस लॅंडमार्कस् या बांधकाम संस्थेच्या पाच भागीदार बिल्डरांसह एकूण आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये जगदीशप्रसाद अग्रवाल, सचिन जगदीशप्रसाद अग्रवाल, राजेश जगदीशप्रसाद अग्रवाल, विवेक सुनिल अग्रवाल, विपूल सुनील अग्रवाल यांच्यासह साईट इंजिनिअर, साईट सुपरवायझर, कंत्राटदार यांचा समावेश आहे.


Pune Wall Collapse | पुण्यात मृत्यूचं तांडव, कोंढवा परिसरात भिंत कोसळून 16 मजुरांचा मृत्यू | ABP Majha



कशी घडली घटना ? 


पुण्यातील बडा तालाब मस्जिद परिसरात आल्कन स्टायलस या सोसायटीच्या संरक्षण भिंतीला लागून दुसऱ्या इमारतीचं बांधकाम सुरु होतं. या बांधकामासाठी असलेल्या मजुरांनी आल्कन स्टायलस या सोसायटीच्या संरक्षण भिंतीला लागून झोपड्या उभारल्या होत्या. काल (शुक्रवार) दिवसभर पडलेल्या पावसामुळे सोसायटीची संरक्षण भिंत खचून मजुरांच्या कच्च्या घरांवर कोसळली. त्यामध्ये 15 मजुरांचा मृत्यू झाला आहे.


मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांची मदत


दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदतीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच बहुतांश मजूर महाराष्ट्राबाहेरील असल्याने सर्वांचे मृतदेह त्यांच्या गावी पोहोचवण्याची सोय करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.


संबंधित बातम्या