मुंबई : पुण्यातील कोंढवा भागात सोसायटीची भिंत कोसळून 15 मजुरांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. मात्र पुण्यात अशी घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही पुण्यात अशा घटना घडल्या आणि अनेकांना यामध्ये आपला जीव गमवावा लागला आहे.


मात्र बांधकाम व्यावसायिकांवर आवश्यक निर्बंध नसल्याने आणि दुर्घटना घडल्यानंतर दोषींवर आवश्यक ती कारवाई होत नसल्याने अशा दुर्घटना सुरुच आहेत. याआधीच्या घटनांमध्येही बिल्डरांवर कोणतीही कडक कारवाई झालेली दिसत नाही.


पुण्यातील आधीच्या घटना 


- पुण्यातील बाणेर भागात 29 जुलै 2016 रोजी 13 मजली इमारतीचा स्लॅब कोसळल्याने नऊ मजुरांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी कंत्राटदार आणि अभियंते अशा सहा जणांना अटक केली होती. मात्र या प्रकरणात चार बिल्डरांना गुन्हा नोंद होऊनही अखेरपर्यंत अटक झाली नाही.


- पुण्यातीलच तळजाई टेकडीवर सप्टेंबर 2012 मध्ये अनधिकृत इमारती कोसळून 11 मजुरांचा मृत्यू झाला होता.


-  वाघोलीमध्ये 18 डिसेंबर 2012 रोजी एका इमारतीच्या घुमटाचं काम सुरू होतं. या बांधकामादरम्यान घुमटाचा भाग कोसळून 12 मजूर आणि एक अभियंता असे मिळून 13 जण ठार झाले होते.


-  दत्तवाडी परिसरात 2016 साली एका सोसायटीची कंपाऊंड भिंत कोसळल्याने तीन महिलांचा मृत्यू झाला होता.


कम्पाऊंड भिंत कोसळलेल्या आल्कन स्टायलस सोसायटीच्या दोन बिल्डरांना पोलिसांनी चौकशी करुन, दोन्ही बिल्डर, कंत्राटदार आणि सुपरवायझर अशा एकूण आठ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.