पुणे : ज्येष्ठ स्त्रीवादी लेखिका आणि महाराष्ट्रातील स्त्री चळवळीच्या अग्रणी कार्यकर्त्या डॉ. प्रा. विद्युत भागवत (Vidyut Bhagwat) यांचे गुरुवारी रात्री निधन झालं. त्या 77 वर्षांच्या होत्या. हृदयविकाराने त्यांचं निधन झालं असून शनिवारी त्यांच्यावर पार्थिववर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विद्युत भागवत यांच्या मागे एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.


विद्युत भागवत यांनी जवळपास तीन दशके स्त्री चळवळीत काम केलं असून देशातील सामाजिक परिस्थितीवर त्यांनी अनेक लेख आणि पुस्तकेही लिहिली आहेत. प्रसिद्ध लेखक आणि फास्टर फेणे फेम भा. रा. भागवत यांच्या त्या सून होत्या. विद्युत भागवत या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला अध्ययन केंद्राच्या संस्थापक संचालिका होत्या. 


विद्युत भागवत यांनी राज्यातील महिला, विद्यार्थी, दलित आणि शेतकर्‍यांच्या प्रश्नावर आवाज उठवला. महिलांविषयक अभ्यासाला स्वतंत्र अभ्यास शाखा म्हणून घडविणाऱ्या विचारवंतांच्या यादीत त्यांचा समावेश होतो. त्यांचे स्त्रियांच्या प्रश्नांवरील लिखाण, स्त्रीवादी सिद्धांत आणि सामाजिक इतिहासावरील लिखाण गाजले. 


शैक्षणिक लेखनाव्यतिरीक्त त्यांनी मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्रांतही लिखान केलं. कथा, कविता आणि कादंबरीलेखनासाठी त्या ओळखल्या जायच्या. विविध भारतीय भाषांमधील लेखिकांचे साहित्य एकत्र आणणाऱ्या 'विमेन्स रायटिंग इन इंडिया' या प्रकल्पाच्या त्या संपादक होत्या.


विद्युत भागवत यांनी खासकरून स्त्रियांच्या प्रश्नावर लेखन केलं. 'फेमिनिस्ट सोशल थॉट्स' हे त्यांचं महत्त्वाचं पुस्तक आहे. त्यांची पहिली कादंबरी 'आरपारावलोकिता' ही 2019 साली पुण्यातील हरिती प्रकाशनने प्रकाशित केली. 


विद्युत भागवत यांच्या 'स्त्री प्रश्नाची वाटचाल' या पुस्तकाच्या लेखनासाठी 2005 सालचा समाजविज्ञान कोश पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच 2006 साली त्यांना महाराष्ट्र सारस्वत गौरव पुरस्काराने गौरवण्यात आलं. 


ही बातमी वाचा: