पुणे : वसंत मोरे (Vasant More) यांनी मनसेचा राजीनामा दिला. राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. राज ठाकरेंना हा मोठा धक्का मानला गेला. त्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनीदेखील धडाधड राजीनामे दिले. त्यानंतर वसंत मोरे कोणत्या पक्षात जाणार याच्या चर्चा रंगल्या मात्र दोन दिवसांत मी सगळं जाहीर करेन असं ते राजीनामा देताना म्हणाले. त्यातच आता वसंत मोरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आज शरद पवार पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी वसंत मोरे हे शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे.


वसंत मोरे यांना शरद पवारांकडून संपर्क झाला होता.काल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) चे डॉक्टर सेलच्या अध्यक्षांनी वसंत मोरे यांची भेट घेतली होती. आज राष्ट्रवादीच्या कार्यालयात वसंत मोरे हे शरद पवार आणि जयंत पाटील यांची भेट घेण्याची शक्यता आहे. शरद पवारांच्या भेटीनंतर वसंत मोरे नेमका कोणता निर्णय घेतील, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.  


साधारण महिन्याभरापूर्वी शरद पवारांनी पुण्यात मेळावा आयोजित केला होता. यावेळी वसंत मोरे अचानक या मेळाव्यात पोहोचले होते. त्यानंतर मनसेचे फायर ब्रॅंड नेते शरद पवारांचा हात धरतात का?, अशा चर्चा रंगल्या होत्या. आता ते थेट मनसेचा राजीनामा दिल्यावर ते शरद पवारांना भेटणार आहेत. 


वसंत मोरेंना विविध पक्षातून ऑफर


वसंत मोरेंनी राजीनामा दिल्यानंतर विविध पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी त्यांची भेट घेतली. कॉंग्रेसचे माजी आमदार मोहन जोशींनी भेट घेतली होती. त्यानंतर अजित पवार गटाच्या रुपाली ठोंबरेंकडून वसंत मोरेंना अजित पवार गटात येण्यासाठी खुली ऑफर देण्यात आली .माझी ऑफर मी त्यांना दिली आहे. अजित पवार आणि मोरे यांचा थेट संपर्क आहे,असं रुपाली ठोंबरे म्हणाल्या होत्या. या सगळ्यांच्या ऑफरवर बोलताना वसंत मोरे म्हणाले होते की, साधारण मी अजून राजीनामा दिल्याच्या प्रसंगातून सावरलो नाही आहे. मला कार्यकर्त्यांशी संपर्क साधायचा आणि त्यांच्याशी चर्चादेखील करायची आहे.   सगळ्यांशी चर्चा करुन मी निर्णय घेणार असल्याचं ते म्हणाले होते. मात्र आता ते शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याचं दिसत आहे. शरद पवार गटासोबत मोरे पुढची वाटचाल करणार का? की अजून काही वेगळा निर्णय घेणार?, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 


इतर महत्वाची बातमी-