पुणे: खरं तर खंडणीखोरांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कारवाई करणं हे पोलिसांचं कर्तव्य. पण पुण्यातल्या पोलिसांना त्याचा विसर पडलेला दिसतो. कारण पोलीस निरीक्षक धनंजय धुमाळनं 25 लाखाची खंडणी मागितली. त्यानंतर धुमाळविरोधात गुन्हा दाखल करण्याऐवजी त्याच्यावर मेहबानी दाखवली आणि नियंत्रण कक्षात बदली करुन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला.
स्टिंग ऑपरेशन:
धनंजय धुमाळ - आज संध्याकाळपर्यंत होईल का काम?
तक्रारदार - सर, आता माझ्याकड़े 14 लाख रेडी आहेत
धनंजय धुमाळ - कधीपर्यंत होईल काम?
तक्रारदार - उद्या संध्याकाळपर्यंत 25 पूर्ण करु शकतो सर, फक्त थोडासा प्रॉब्लेम काय झालाय, 1000 आणि 500 च्या नोटांचा..
धनंजय धुमाळ - जास्त आहेत
तक्रारदार - सर, मार्केटमध्ये कॅशचं शॉर्टेज आहे
धनंजय धुमाळ - बर, चल दोन्हीमध्ये कर काही प्रॉब्लेम नाही
पुणे पोलिसांच्या कारभाराचे वाभाडे काढणारं स्टिंग ऑपरेशन तक्रारदारानं केलं आहे.
बाणेरमधील सर्व्हे नंबर 90 मध्ये बांधकाम व्यावसायिक संदीप जाधव आणि त्याच्या भागीदारानं जमीन विकत घेतली. पण त्यावरुन वाद सुरु झाला. प्रकरण पोलीस ठाण्यात आलं. त्यानंतर पोलीस निरीक्षक धनंजय धुमाळनं संदीप जाधवला मोक्का आणि इतर गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन 25 लाखाची खंडणी मागितली. ती सुद्धा पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या नावानं.
खरंतर स्टँडर्ड प्रोसिजरप्रमाणं संदीप जाधवच्या तक्रारीनुसार पोलीस निरीक्षक धनंजय धुमाळविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. मात्र तसं झालं नाही. उलट रश्मी शुक्ला यांनी धनंजय धुमाळची नियंत्रण कक्षाला बदली करुन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. इतकंच नव्हे तर धुमाळच्या लाचखोरीवर पुणे पोलीस दलातून कुणीही अवाक्षर काढायला तयार नाही.
धनंजय धुमाळवर रश्मी शुक्लांनी दाखवलेल्या मेहरबानीचं कारणही तसंच आहे. संदीप जाधव आणि हेमंत गांधींनी 80 लाख रुपये स्टँप ड्युटी भरुन बाणेरमधील 15 गुंठे जमीन संजय मुथा यांच्याकडून विकत घेतली.
मात्र संजय वाघमारे आणि राजेंद्र चांदेरे यांनी बाणेरमधील जागा आपली असल्याचा दावा करत न्यायालय गाठलं. दरम्यान मार्च 2016 मध्ये संजय मुथा आणि संदीप जाधव यांच्यातही वाद झाले. मुथा यांनी चतृ:श्रुंगी पोलिसात जाधव आणि गांधींविरोधात तक्रार दिली. त्यानंतर 30 मे रोजी एटीएसमध्ये काम करणाऱ्या धनंजय धुमाळ यांनी संदीप जाधवला समन्स बजावलं.
खरंतर एटीएसचा आणि जमीन प्रकरणाचा संबंध नसतानाही रश्मी शुक्लांनी हे प्रकरण तपासासाठी धनंजय धुमाळकडे दिलं.
एटीएसमध्ये असलेल्या धुमाळकडे प्रकरण सोपवल्यानंतर अडचण येऊ नये म्हणून रश्मी शुक्लांनी धुमाळची बदलीही प्रॉपर्टी सेलला केली आणि त्यानंतर मॅडमना 25 लाख रुपये द्यावे लागतील असं सांगून धुमाळ धमकावत राहिला. आता याच मेहरबानीमुळं रश्मी शुक्लांनी धनंजय धुमाळला वाचवण्याचा प्रयत्न सुरु केला नाही ना? अशी चर्चा रंगू लागली आहे.
दरदिवशी होणाऱ्या खून, बलात्कार, दरोड्यांमुळं आधीच गृहखात्याची बेअब्रू झाली आहे. आता तर पोलीस आयुक्तांच्या नावानंच खंडणी घेण्याचं काम सुरु आहे आणि अशा खंडणीखोरांना आयुक्त मॅडम अभयसुद्धा देत आहेत. त्यामुळं या प्रकरणात काय चाललंय हे वेगळं सांगण्याची गरज नाही.