Pune Transgender Marriage: आमचं एकमेकांवर प्रेम आहे हे कळल्यावर आधार वाटला. समाजात आम्हाला वेगळ्या नजरेनं बघतात मात्र एक नजर मला आयुष्यभरासाठी स्वीकारताना दिसली. शिवाय मी आहे तसं स्वीकारताना दिसली. प्रेम वगरे असतं मात्र आम्ही दोघे एकमेकांचा फार आदर करतो. त्यामुळे आम्ही एकत्र राहण्याचा आणि विवाह करण्याचा निर्णय घेतला, असं तृतीयपंथी सुरक्षा रक्षक रूपा टांकसाळ सांगत होत्या.


आतापर्यंत आपण वेगवेगळ्या पद्धतीचा विवाह पाहिला असेल मात्र पिंपरी-चिंचवडमध्ये समाजाला वेगळा आरसा दाखवणारा विवाह पार पडला. पिंपरी-चिंचवड महापालिकेत (पीसीएमसी) नियुक्त झालेल्या एका ट्रान्सजेंडर जोडप्याचे धुमधडाक्यात विवाह केला. सुरक्षा रक्षक रूपा टांकसाळ आणि ग्रीन मार्शल प्रेम संतोश लोटलीकर असं या तृतीयपंथी जोडप्याचं नाव आहे. रुपा बुलढाण्याची तर प्रेम रत्नागिरीचे आहेत. 


 


वैदिक पद्धतीने (पारंपारिक पद्धतीने) लग्न केले. पीसीएमसीचे अधिकारी आणि काही सहकाऱ्यांच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला. एलजीबीटीक्यू समुदायाला महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याचा निर्णय आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी नुकताच घेतला. LGBTQ कामगारांना नियुक्त करणारी PCMC ही देशातील पहिली नगरपालिका आहे. त्यामुळे या समुदयाबाबत समजात आदर वाढला आहे.


ठाण्यातील कार्यक्रमात झाली भेट


प्रेम पदवीधर आहे,तर रूपा 12 वी पर्यंत शिकलेली आहे. दोघेही एक वर्षापूर्वी ठाण्यात ट्रान्सजेंडर समुदायाच्या एका कार्यक्रमात भेटले होते. ते एकमेकांना वारंवार भेटू लागले. त्यानंतर दोघेही एका एनजीओमध्ये काम करू लागले. पुढे मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. रूपा पुण्यात तर प्रेम कल्याणमध्ये कामाला होता. दरम्यान, PCMC ने LGBTQ समुदायाला नोकरीत सामावून घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर रूपाने या ऑफरचा लाभ मिळवण्यासाठी स्वत: आणि प्रेमसह 15 ट्रान्सजेंडर मिळवण्याचा प्रयत्न केला. दोघेही कामानिमित्त पिंपरी-चिंचवडला आले असता त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.


वाढदिवसाला व्यक्त केलं प्रेम
डिसेंबर महिन्यात रूपाचा वाढदिवस असतो त्यानिमित्ताने प्रेमने रुपाला प्रपोज केलं, लग्नाची मागणी घातली. तेव्हा, जग आपल्याला काय म्हणेल असा मनात विचार आला. समाजात तृतीयपंथी, ट्रान्समेन, ट्रान्सवूमन यांना महत्वाचं स्थान मिळावं, असं दोघांचं मत आहे.


“गेल्या वर्षी जुलैमध्ये आम्ही ठाण्यात भेटलो, मी बुलढाणा जिल्ह्यातील आहे. एका NGO मध्ये काम करत असताना आमची भेट झाली. आमची मैत्री झाल्यानंतर आम्ही लग्न करण्याचा विचार करत होतो, पण नोकरीमुळे आम्हाला मुख्य प्रवाहात आणले गेले. आम्हाला एकत्र आणण्यात आयुक्त राजेश पाटील यांचा मोठा वाटा आहे. आम्ही आधी नोंदणीकृत विवाह केला होता पण आम्हाला वैदिक विवाह करायचा होता. त्यानुसार आम्ही लग्न केले,” रूपा यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.


“मी रत्नागिरीचा आहे, पण माझे कुटुंब कल्याणमध्ये स्थायिक झाले आहे. मी आणि रूपा रिलेशनशिपमध्ये आहोत हे माझ्या घरात सर्वांना माहीत आहे. पण रूपाच्या घरात अशी कल्पना नव्हती. नोकऱ्या मिळाल्यानंतर आम्ही त्याच शहरात राहायला गेल्यानंतर सहा महिन्यांनी आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला”, ग्रीनमार्शल आणि नवविवाहित प्रेम म्हणाले.