Pune News: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाबाबत पुणे जिल्ह्याचे नियोजन चांगले झाले 21 लाख 60 हजार घरांवर तिरंगा फडणार आहे.  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यामुळे शहरात अनेक ठिकाणी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे. उपक्रमादरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केल्यास येथील कला, संस्कृतीला अधिक उजाळा मिळणार आहे. पुण्यातील अनेक ठिकाणी तिरंग्याची विक्री केंद्र असणार आहे.


पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी या संदर्भात बैठक घेतली होती. यावेळी  केंद्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाअंतर्गत पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या संचालक किरण सोनी गुप्ता, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते. 


पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी या उपक्रमाबाबत जिल्ह्यातील नियोजनाची माहिती दिली. जिल्ह्यात 21 लाख 60 हजार कुटुंबे असून या प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापड उद्योग, व्यवसाय असून त्या माध्यमातून ध्वजाची उपलब्धता करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. माफक दरात ध्वज उपलब्ध करुन देण्यात येणार असून काही दानशूर संस्था, सहकारी साखर कारखाने आदींकडून गरजूंना ध्वज मोफत उपलब्ध करुन देण्याचे नियोजन आहे. 


पुणे, पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची चांगली नाट्यगृहे, सांस्कृतिक सभागृहे असून याठिकाणी तसेच नगरपरिषद पातळीवरही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे यावेळी प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यावर युवा महोत्सव, स्थानिक कला, लोककलांना ठळकपणे दर्शवणारे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात व्हावेत. त्यासाठी पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्यावतीने आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल, असे सोनी गुप्ता म्हणाल्या.