पुणे : तुम्हाला कधी पाकिट किंवा पर्स चोरीला गेल्याचा अनुभव आला आहे का? चोरीला गेलेल्या पाकिटातील कागदपत्रं चोराकडून परत मिळाल्याचं उदाहरण तर तुम्ही नक्कीच ऐकलं नसेल. मात्र पुण्यातील सपना डे यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे.


सपना डे या पुण्यातील व्यावसायिक 17 मार्चला संध्याकाळी रेसकोर्स भागात फिरण्यासाठी गेल्या होत्या. कार पार्क करुन त्या पायी फिरायल्या गेल्या. परत आल्यानंतर त्यांना गाडीची मागील बाजुची कार फोडल्याचं लक्षात आलं.

चोरट्यांनी त्यांच्या सीटवरची बॅग लंपास केली होती. या बॅगेत रोख रक्कम, घर आणि दुकानाच्या चाव्या आणि ड्रायव्हिंग लायसन्स होतं. या प्रकरणी त्यांनी पोलिस चौकीत बॅग चोरीला गेल्याची तक्रारही नोंदवली.

लायसन्स चोरीला गेल्यामुळे गाडी चालवण्यात त्यांना अडचणी येत होत्या. त्यामुळे त्यांनी नव्याने लायसन्स काढण्याची तयारी सुरु केली होती. परंतु गेल्या गुरुवारी, म्हणजे 28 मार्चला त्यांच्या नावे आधीच्या घरी एक पार्सल आलं. शेजारी राहणाऱ्या महिलेने ते पार्सल सपना यांना आणून दिलं.

पार्सल उघडून पाहिल्यावर त्यांना धक्काच बसला. कारण ज्या चोरट्याने पंधरा दिवसांपूर्वी त्यांची बॅग चोरली होती, त्याने चक्क बॅगेतील लायसन्स कुरिअरने पाठवलं होतं. ते पार्सल पाहून सपना आनंदित झाल्या.

पुणे शहरात आतापर्यंत अनेक चोरीच्या घटना घडल्या आहेत. मात्र असा अजब चोर पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे.