पुणे : शाळेत कबड्डी खेळताना चक्कर येऊन पडल्यानंतर विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील नवोदय विद्यालयात शनिवारी हा प्रकार घडला. आठवीत शिकणाऱ्या गौरव अमोल वेताळचा दुर्दैवी मृत्यू झाला.


कबड्डी खेळताना चक्कर येऊन गौरव एकाएकी पडला होता. या घटनेचा व्हिडिओही चित्रित झाला आहे. पुण्यात शिरुर तालुक्यातील पिंपळे जगतापमधील नवोदय विद्यालयात शनिवारी संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

कबड्डी खेळताना चक्कर आल्यानंतर गौरवला शिक्रापूरमधील माऊलीनाथ मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. गौरवचं शवविच्छेदन झालं असून त्याचा अहवाल अद्याप बाकी आहे.

गौरव हा चांगला कबड्डीपटू होता. त्याचप्रमाणे तो फिट होता, त्याला कोणत्याही प्रकारचा जुना आजार नव्हता, अशी माहिती गौरवचे काका अंकुश सोनावणे यांनी दिली.

शाळा प्रशासनानं नेमकी घटना काय घडली, कशी घडली आणि किती वाजता घडली हे सांगितलं नाही. शाळा प्रशासन जबाबदारी झटकत असल्याचा दावा केला जात आहे. पोलिस घटनास्थळी दाखल असून पंचनामा सुरु आहे.